महाराष्ट्रासह देशभरात मतचोरी झाली! राहुल गांधींनी पुराव्यांसह केली निवडणूक आयोगाची पोलखोल

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यांसह निवडणूक आयोगाची पोलखोल केली. मतदार यादीतील अनियमितता आणि घोळ त्यांनी पुराव्यांसह मांडत मतचोरी कशी झाली ते स्पष्ट केले. महाराष्ट्रासह देशभरात मतचोरी सुरू असल्याचे त्यांनी दाखवून दिले. संविधानाचा पाया मतदान आहे. अशा परिस्थितीत मतदारांनाच मतदान करण्याची परवानगी दिली जात आहे का? मतदार यादीत बनावट मतदार जोडले गेले होते का? असे अनेक सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.

राहुल गांधी यांनी पीपीटी सादरीकरण करत मतचोरीचे अनेक पुरावे दिले. तसेच महाराष्ट्र निवडणूकीत मत चोरी झाल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रात आपण निवडणूक हरलो. महाराष्ट्रात 40 लाख अतिरिक्त मतदार आहेत. पाच महिन्यांत येथे बरेच मतदार मतदारयादीत घुसडण्यात आले. अनेकांची घर क्रमांक शून्य आहे. अनेकांची नावे, वडिलांचे नाव, आडनाव यात घोळ आहे. तसेच नव मतदारांसाठी असलेल्या फॉर्म 6 चा गैरवापर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नव मतदारांऐवजी 45 ते 95 वय असलेल्यांच्या नावाचाही यात समावेश आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादीबद्दल उत्तर द्यावे. मतदार यादी बरोबर आहे की चूक हे त्यांनी सांगावे? असे आव्हानही राहुल गांधी यांनी दिले.

निवडणूक आयोग इलेक्ट्रॉनिक डेटा का देत नाही? आम्ही आयोगाकडे वारंवार डेटा मागितला पण तो आम्हाला देण्यात आला नाही. निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर देण्यासही नकार दिला. मतदार यादीतील घोळ आणि मतचोरी उघड होईल याच भीतीने निवडणूक आयोगाने डेटा दिला नाही, असे राहुल गांधी म्हणाले.देशात बनावट मतदान सुरू आहे. ही चोरी पकडण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागला. या मतदार यादीत अनेक लोकांच्या वडिलांच्या नावासमोर काहीही लिहिले गेले आहे. मतदार यादीतील अनेक घरांचे पत्ते शून्य आहेत. डुप्लिकेट मतदारांची संख्या खूप जास्त आहे. तीन वेळा मतदान करणारे 11 हजार संशयास्पद लोक आहेत. हे लोक कुठून येत आहेत? एकाच पत्त्यावर 46 मतदार आहेत, असे अनेक पुरावे सदार करत त्यांनी महाराष्ट्रासह देशात मतचोरी होत असल्याचे दाखवून दिले आहे.