
सामना ऑनलाईन । बाराबंकी
मायावती आणि अखिलेश यादव यांचा राजकीय इतिहास पंतप्रधान मोदी यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांचा रिमोट कंट्रोल मोदींकडे आहे. माझा मात्र असा कुठलाही इतिहास नाही. त्यामुळे मी टीका करताना मोदींना घाबरत नाही. उलट तेच मला घाबरतात, असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले. निवडणूक प्रचारात सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य बनवणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील प्रचारसभेत सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावरही टीकेची तोफ डागली.
‘मोदी माझ्यावर दबाव टाकू शकत नाहीत, मात्र मायावती आणि अखिलेश यांना ते घाबरवू शकतात. मोदी काँग्रेसमुक्त हिंदुस्थानची घोषणा देत होते, मात्र तीन वर्षांतच आम्ही त्यांचा फुगा फोडला आहे.’, अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदींवर सडकून टीका केली. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील रामनगर येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
नीरव मोदीला तुरुंगवास नाही, मग शेतकऱयांना वेगळा न्याय का?
‘जेव्हा नीरव मोदी 11 हजार कोटी रुपये घेऊन देशातून पळून गेला तेव्हा त्याला तुरुंगात पाठवण्यात आले नाही तर शेतकऱयांना आम्ही तुरुंगात कसे पाठवू शकतो, असा सवाल करीत राहुल म्हणाले, ‘न्याय’ योजनेमुळे गरीबांना पैसे दिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही. गरीबांच्या खात्यात 72 हजार रुपये गेले तर रोजगार आणि व्यवसायाच्या संधी वाढतील, असा विश्वासही यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केला.


























































