
पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी, पत्रकार आणि न्यायव्यवस्थेवर दबाव टाकत आहेत. जनतेचा आवाज दाबू पहात आहेत. जे काम देशाचे दुश्मन करू शकले नाहीत ते मोदी करत आहेत. पण, अशाप्रकारे दबाव टाकाल तर हिंदुस्थानातील जनता तुम्हाला चोख उत्तर देईल. अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला. देशाची प्रगती रोखण्यासाठी देशाच्या दुश्मनानी कुठलीच कसर बाकी सोडली नाही. पण, ते जे करू शकले नाहीत ते काम मोदी करत आहेत. त्यांनी अर्थव्यवस्थेची पार वाट लावून टाकली अशी टिकाही राहुल गांधी यांनी केली.
आज आम्ही राज्यघटनेची प्रस्तावना वाचून सत्याग्रह आंदोलन केले. हा जनतेचा आवाज आहे. याच आवाजाने इंग्रजांना पळवून लावले, करोडो युवकांना रोजगार दिले. अर्थव्यवस्था उभी केली. ही अर्थव्यवस्था नष्ट करण्याचा, जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न देशाच्या दुश्मनांनी केला. पण, ते करु शकले नाहीत. तेच काम आज मोदी करत असल्याचा आरोप राहुल यांनी केला. सोमवारी राजघाटावर राज्यघटनेची प्रत वाचून राहुल गांधी यांनी सत्याग्रह आंदोलन केले. या आंदोलनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. हिंदुस्थानात द्वेष पसरवणे आणि उभी फुट पाडणे हे तुम्हाला वर्षानुवर्षे शिकवले गेले, त्यात तुम्ही नंबर वन आहात. तुम्हाला केवळ द्वेश पसरवणे येते हे विद्यार्थ्यांना माहीत आहे. राहुल यांनी मोदींवर त्यांच्या महागडया कपडयांवरूनही टिकास्त्र्ा सोडले. तुम्ही कोटयावधि रुपयांचे कपडे परिधान करता, त्यावरूनच तुमची ओळख होते असेही राहूल म्हणाले.



























































