
क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाच्या पराभवानंतर ट्विटरवर अचानक पनौती हा शब्द चांगलाच ट्रेंड झाला होता. याच शब्दाचा पुनरुच्चार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या प्रचारसभेत केला आहे. त्यांच्या भाषणानंतर राहुल गांधींचा रोख कुणाकडे होता, याच्या चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगल्या आहेत.
राजस्थान येथे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना काँग्रेसच्या प्रचारसभेत राहुल गांधी बोलत होते. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाचा उल्लेख करताना राहुल गांधी यांनी कुणाचंही नाव न घेता सणसणीत टोला हाणला. आपले खेळाडू छानपैकी विश्वचषक जिंकू शकले असते, पण पनौती लागली आणि हरले. टीव्हीवाले हे कधीच दाखवणार नाहीत. पण जनतेला सगळं काही ठाऊक आहे, असं राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं.
View this post on Instagram
विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानचा संघ जबरदस्त फॉर्मात असताना अंतिम सामन्यात मात्र सर्वात खराब खेळी करत जगज्जेत बनण्याची संधी गमावली. त्यामुळे संपूर्ण जगभरातील चाहते नाराज झाले आहेत. रविवारी झालेला सामना संपताच सोशल मीडियावरून टीम इंडिला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. मात्र त्या सोबतच अचानक पनौती ट्रेंड देखील टॉपवर आला. अनेक जण या सामन्याला कशाची व कुणाची पनौती (पनवती) लागल्याचे सांगत सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग करू लागले होते.