मोदी सरकार चीनचे नाव घ्यायला घाबरते; राहुल गांधी यांचा जोरदार हल्ला

अरुणाचल प्रदेशवर वारंवार दावा सांगणाऱया चीनचा तिथल्या 30 ठिकाणांची नावे बदलल्यावरही मवाळ शब्दांत निषेध करणाऱया केंद्र सरकारचा दुबळेपणाच यातून दिसून येतो. मोदी सरकार चीनचे नाव घ्यायलाही घाबरते, असा जोरदार हल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरून चढवला आहे.

चीनने आमच्या अरुणाचल प्रदेशातील 30 जागांची नावे बदलली. यावर परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणतात, त्याने काय फरक पडतो? मी जर तुमच्या घराचे नाव बदलले तर ते घर माझे थोडेच होणार आहे? हे किती लाजीरवाणे आहे. पंतप्रधान मोदीही चीनचे नाव घेत नाहीत आणि परराष्ट्रमंत्रीही चीनला घाबरतात, असे ट्विट करत काँग्रेसने मोदी सरकारचा भित्रेपणा चव्हाटय़ावर मांडला आहे.

कत्छाथीवू बेटावरून जे उगाचच बेटकुळय़ा फुगवून दाखवत आहेत. ते कुरापतखोर आणि आक्रमक चीनचे नुसते नाव घ्यायलाही घाबरत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसने भाजप सरकारचा पर्दाफाश केला आहे.

राष्ट्रवादीचेही शरसंधान

सत्ता राखण्यात मोदी इतके तल्लीन झालेत की, त्यांना चीनकडून हिंदुस्थानी हद्दीत होणाऱया कुरापती दिसेनाशा झाल्या आहेत, असे शरसंधान याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवरून केले आहे. “इथे मोदींनी 56 इंचाची छाती म्हणून हिंदुस्थानातील शहरांची नावे बदलली, मात्र तिकडे चीनने अरुणाचल प्रदेश सीमेवरील 56 ठिकाणांची नावे आतापर्यंत बदलली आहेत,’’ अशी टीका या ट्विटद्वारे करण्यात आली आहे.

सरकारची भूमिका बोटचेपी

चीनने नावे बदलल्याचे काल जाहीर केल्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे थेट नाव न घेता हे नामांतर फेटाळले होते. यामुळे चीनचा थेट निषेध करण्याची हिंमत न दाखवणाऱया केंद्र सरकारवर आज काँग्रेससह इतर विरोधी पक्षही तुटून पडले. चीनने इतके आक्रमक पाऊल उचलल्यानंतरही सरकारने बोटचेपी भूमिका घेतली आहे. हिंदुस्थानसारख्या बलाढय़ राष्ट्राला ही भूमिका शोभत नाही. चीनसमोर नेहमीच गुडघे टेकणाऱया आपल्या सरकारची हतबलता यातून दिसून येते, असे काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. चीनच्या घुसखोरीबद्दल विरोधी पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत अनेकदा हा मुद्दा उपस्थित करूनही पंतप्रधान किंवा परराष्ट्र मंत्र्यांनी चिनी घुसखोरीबद्दल एक शब्दही उच्चारलेला नाही, असा दावा करत या सरकारला देशाच्या अखंडतेची पर्वा नाही, असे ते म्हणाले.