मोदी कितीही पळाले, लपले तरी सत्य बाहेर येणारच – राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी पळू शकतात, लपू शकतात पण सत्य बाहेर येणारच. पंतप्रधान मोदी घाबरले असून, त्यामुळेच सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना हटविले असा हल्लाबोल आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सीबीआय मुख्यालयावर निदर्शने करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना अटक करून त्यांची सुटका करण्यात आली.

‘राफेल’ घोटाळ्याची चौकशी सीबीआय संचालक आलोक वर्मा यांनी केल्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले, असा आरोप करीत राहुल गांधी यांनी सीबीआय मुख्यालयावर आंदोलन करणार असे जाहीर केले होते. त्यानुसार आज दिल्लीतील सीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली दयाल कॉलेजपासून मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस नेते, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

भाकप नेते डी. राजा, ज्येष्ठ नेते शरद यादव, तृणमुलचे नेतेही सहभागी झाले. सीबीआय मुख्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चा अडविल्यानंतर राहुल गांधी बॅरिकेट्स आणि कारच्या टपावर बसले. दुपारी राहुल गांधींसह काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी लोधी रोड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अटक करून घेतली. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, काँग्रेसच्या वतीने चंदीगड, मुंबई, कर्नाटक, लखनौसह देशभरात सीबीआय कार्यालयाबाहेर आंदोलने करण्यात आली.

पंतप्रधान मोदींनी देशातील प्रत्येक संस्थेचे नुकसान केले
पोलीस स्टेशनबाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र्ा सोडले. निवडणूक आयोग असो, सीबीआय असो देशातील प्रत्येक संस्थेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकसान केले आहे. देशाचा चौकीदार चोर असल्यामुळे प्रत्येक संस्थेवर हल्ला केला जात आहे, असे टीकास्त्र्ा राहुल गांधींनी सोडले. पंतप्रधान मोदी पळू शकतात, लपू शकतात पण अखेर सत्य बाहेर येणारच. सीबीआय संचालकांना हटविण्याचा काहीही फायदा होणार नाही. पंतप्रधान मोदींनी घाबरून आलोक वर्मा यांना हटविण्याचा आरोपही त्यांनी केला.