नरेंद्र मोदींच्या रक्तातच द्वेष आहे, त्यांना लोकांमध्ये फूट पाडून द्वेष पसरवायचा आहे – राहुल गांधी

“नरेंद्र मोदींच्या रक्तात द्वेष आहे. त्यांना लोकांमध्ये फूट पाडायची आहे आणि द्वेष पसरवायचा आहे. प्रेम आणि बंधुता माझ्या रक्तात वाहते. मला हिंदुस्थानला एकत्र जोडायचं आहे. हाच फरक आहे, हाच लढा आहे”, असं काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. बिहारमधील किशनगंज येथे निवडणूक सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत राहुल गांधी म्हणाले की, “नरेंद्र मोदी फक्त अदानी आणि अंबानींशी बोलतात. सूट आणि बूट घातलेल्या लोकांना भेटतात. ते कधीच शेतकरी, कामगार किंवा तरुणांशी संपर्क साधत नाहीत. मोदी कधी बिहारमधील शेतकरी, कामगार आणि तरुणांना भेटले तर ते त्यांना सांगतील की, त्यांना अन्न प्रक्रिया युनिट्स, रुग्णालये आणि रोजगाराची गरज आहे. पण नरेंद्र मोदी गरिबांशी बोलू इच्छित नाहीत.”

मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले, “काही दिवसांपूर्वी मी पत्रकार परिषद घेतली. मी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मते चोरण्यासाठी संगनमत केल्याचा थेट आरोप केला. पण या तिघांनी आरोपांवर भाष्य केले नाही. ते करू शकत नाहीत, कारण मी देशासमोर सत्य मांडले. हरियाणात २ कोटी मतदार आहेत, त्यापैकी २५ लाख बोगस मतदार आहेत. हे स्पष्ट आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा मते चोरून निवडणुका जिंकतात.”