
सामना प्रतिनिधी । अलिबाग
रायगडमधील 79 ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य पदासाठी आज 24 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली असून उमेदवारांचे भवितव्य मतदार पेटीत बंद झाले आहे. मतदार राजाने कोणाला आपले बहुमूल्य मत दिले आहे हे उद्या 25 फेब्रुवारी रोजी मतमोजणी नंतर कळणार आहे.
दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात साधारण 60 टक्के मतदान पार पडले होते. जिल्ह्यातील 79 सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या 300 मतदान केंद्रावर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदारांनी सकाळपासूनच मतदार केंद्रावर मतदानासाठी रांगा लावलेल्या होत्या. तर निवडणुकीच्या मतदान काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता.
79 सरपंचपदासाठी 226 उमेदवार रिंगणात असून 689 सदस्य पदासाठी 1 हजार 631 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. आज 24 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी मतदारांनी लवकरच मतदान केंद्रावर भल्या मोठ्या रांगा लावून मतदान केले. यावेळी जेष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आले होते. तर दुपारच्या वेळी मतदार केंद्रावर तुरळक गर्दी दिसत होती.
उद्या 25 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून निवडणूक असलेल्या तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात ही मतमोजणी होणार आहे. तर अलिबागमध्ये सर्वाधिक 25 ग्रामपंचायतीचे निकाल असल्यामुळे मतमोजणी नेहुली येथील क्रीडा संकुलात होणार आहे. त्यामुळे मतमोजणी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.


























































