रायगड जिल्ह्यात 13 नवीन शिवभोजन केंद्रे सुरु होणार

562

संपूर्ण जगभरात कोरोनाने दहशत माजवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात 14 एप्रिलपर्यंत हातावर पोट असणाऱ्या लोकांना जगणे कठीण झाले आहे. गोरगरिबांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांची उपासमार होऊ नये, याकरिता रायगडातील विविध तालुक्यांमध्ये 13 नवीन शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. याआधी जिल्ह्यात 10 शिवभोजन केंद्रे होती. त्यामुळे आता एकूण 23 केंद्रावर या योजनेचा लाभ मिळणार आहे.

राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी शिवसेनेचा महत्वाचा मुद्दा होता तो 10 रुपयांतील भरपेट मिळणाऱ्या शिवभोजन थाळीचा. महाआघाडीसरकार स्थापन झाल्यानंतर काहीच दिवसात राज्यात अनेक शिवभोजन केंद्रे स्थापन झाली. त्यावेळी रायगडमध्ये विविध तालुक्यांत एकूण 10 शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली.

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात जमावबंदीचे आदेश दिले. शासनाकडून लोकांना घराबाहेर न पडण्याची विनंती करण्यात आली परंतु यामुळे गोरगरीब जनतेचे हाल झाले. दैनंदिन जीवनात कष्ट करून आपली तहान भूक भागविणाऱ्या कष्टकऱ्यांनी आता आपल्या पोटापाण्यासाठी काय करावे हा प्रश्न निर्माण झाला असला, तरी त्यांना आता शिवभोजन थाळीचा आधार मिळणार आहे. लवकरच रायगडमधील विविध तालुक्यांमध्ये 14 नवीन शिवभोजन केंद्रे स्थापन होणार आहेत.

जिल्ह्यात आता एकूण 23 शिवभोजन केंद्रे झाली असून या शिवभोजन थाळीमुळे गोरगरिबांच्या, हातावर पोट असलेल्या वर्गाचा पोटापाण्याचा प्रश्न निकाली लागेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या