माझं नाव शिवसेना…महाडमधील कट्टर शिवसैनिकाच्या कन्येच्या आगळय़ावेगळय़ा नामकरण विधीची सर्वत्र चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘माझं नाव शिवसेना…’ ही टॅगलाईन असलेली शिवसेनेची जाहिरात काही वर्षांपूर्वी खूप गाजली. आता महाडमधील एक चिमुकली, ‘होय, माझे नाव शिवसेना’ असे अगदी हक्काने सांगणार आहे, कारण तिच्या पालकांनी तिचे नावच ‘शिवसेना’ असे ठेवले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनीच महाडच्या किये-गोठवली गावात झालेल्या नामकरण समारंभाची तालुक्यात जोरदार चर्चा आहे.

महाड तालुक्यातील किये-गोठवली गावचे पांडुरंग वाडकर हे कडवट शिवसैनिक. या गावचे उपसरपंचपदही वाडकर यांनी भूषवले आहे. पांडुरंग वाडकर यांची शिवसेनाप्रमुखांवर निस्सीम श्रद्धा. वाडकर यांच्या पत्नीने नुकतेच एका कन्यारत्नाला जन्म दिला. कन्येच्या नामकरण विधीची तारीख ठरली. 17 नोव्हेंबर शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन… आप्तेष्टांना निमंत्रणे गेली आणि किये-गोठवली गावात वाडकरांचा सगळा गोतावळा जमला.

बाळाला पाळण्यात घातले. सुवासिनींनी बाळाच्या कानात कुर्रर्र केले आणि वाडकर दाम्पत्याने स्टेजवरील नावापुढे लावलेला पडदा सरकवताच बाळाचे नाव दिसले. ‘शिवसेना…’ हे नाव पाहताच टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला. ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणाही घुमल्या आणि त्या चिमुकलीसह वाडकर दाम्पत्यावर भगव्या शुभेच्छांचा वर्षाव झाला.

उद्धवजींना लवकरच भेटणार
मी शिवसेनाप्रमुखांचा कडवट शिवसैनिक आहे. एकदा साहेब माझ्या स्वप्नात आले. तेव्हाच मी मुलीचं नाव ‘शिवसेना’ ठेवायचं निश्चित केलं आणि याचा मला आनंद व अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया पांडुरंग वाडकर यांनी व्यक्त केली. ‘शिवसेना’ला घेऊन मी लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेणार असल्याचेही वाडकर म्हणाले.