रायगड- मुंबई गोवा महामार्ग रस्ता कधी पूर्ण होणार प्रवाशांचा संतप्त सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई गोवा महामार्गाचे पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्याचे 84 किमीचे काम 2011 साली पत्रकारांच्या आंदोलनानंतर सुरू झाले. तर इंदापूर ते कशेडी या 77 किलोमीटर महामार्गाचे काम दीड वर्षांपासून सुरू आहे. मात्र 2019 उजाडले तरी पहिला टप्पा अद्यापही पूर्ण झालेला नाही. नऊ वर्षांपासून या महामार्गावर प्रवासी व चाकरमानी यांना खड्डेमय रस्त्यानेच प्रवास करावा लागत आहे. ही शोकांतिका आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकारांनाच रस्त्यावर उतरून या महामार्गासाठी आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. मुंबई गोवा महामार्गाची खड्यामुळे चाळण झाली असल्याने हा महामार्ग कधी पूर्ण होणार असा संतप्त सवाल प्रवाशी करीत आहेत.

मुंबई गोवा महामार्ग हा मुंबईचे प्रवेशद्वार आहे तर कोकणात येणाऱ्या जाणाऱ्याचा भविष्यकाळाचा महामार्ग आहे. मात्र या महामार्गाची खड्यामुळे दुर्दशा झाली होती. यासाठी पत्रकारांनी आवाज उठवून मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य शासनाने 2011 साली 10 टप्यात महामार्गाचे काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पळस्पे ते इंदापूर या 84 किमी रस्त्याचे पहिल्या टप्याचे 700 कोटीचे काम महावीर व सुप्रीम कंपनीला देण्यात आले. बांधा वापरा व हस्तांतरण या तत्वावर हे काम देण्यात आले होते. या पहिल्या टप्याचे काम जून 2014 साला पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र कंपनीच्या ढिसाळ कामामुळे महामार्ग हा खड्डेमयच राहिला.

सुप्रीम व महावीर या कंपन्या दिवाळखोरीत गेल्याने शासनाने पहिल्या टप्याचे काम 2018 साली जे एम म्हात्रे कंपनीला दिले. यासाठी एसबीआय बँकेतर्फे 700 कोटींच कर्जही देण्यात आले. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर टोळ लावून बँकेचे कर्ज प्रथम फेडण्याचे ठरले आहे. यासाठी खार पाडा, सुकेळी खिंड याठिकाणी टोळ बसविण्यात येणार आहेत. कर्नाळा खिंडीतील रस्त्याचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या रस्त्याची परवानगीही शासनाकडून देण्यात आलेली आहे. मात्र जे एम म्हात्रे कंपनीतर्फेही काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अजूनही पहिल्या टप्याचा रस्ता आजही खड्डेमयच राहिला आहे.

पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्याचे काम पूर्ण होईपर्यत रस्त्याची सर्व जबाबदारी ही ठेकेदार कंपनीची आहे, मात्र ती जबाबदारीही कंपनीकडून पूर्ण केली जात नाही. गणेशोस्तव काळात चाकरमानी कोकणात जाण्यासाठी निघायच्या आत खड्डे भरण्याची जबाबदारी ठेकेदार कंपनीची असूनही येता जाता चाकरमान्यांना खड्डेमय रस्त्यानेच यावे लागले आहे. मुंबई गोवा महामार्ग हा रायगड जिल्ह्यातून जात असल्याने पळस्पे ते इंदापूर व इंदापूर ते कशेडी घाट पर्यंत रायगडची हद्द आहे. या मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून झालेली असली तरी शेतकऱ्यांना देण्यासाठी 700 कोटींची गरज असताना 500 कोटीचे वाटप झालेले आहे. तर अजून 200 कोटी रुपयांची गरज आहे. त्यामुळे इंदापूर ते कशेडी घाट मधील भुसंपादन केलेल्या काही शेतकऱ्यांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत.

पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा नऊ वर्ष रखडलेला असून जे एम म्हात्रे कंपनीला ठेका देऊनही अद्यापही काम अपूर्ण राहिलेले आहे. तसेच पेण रेल्वे स्थानक, वाशी फाटा, कांदळपाडा ते गडब दरम्यान बांधलेल्या पुलाचे कामही निकृष्ट दर्जाचे व चुकीचे केलेले आहे. नॅशनल हायवे अधिकारी यांचेही या महामार्गाकडे दुर्लक्ष होत असल्याने मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खड्डेमय रस्त्यानेच अजून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या महामार्गाच्या कामामध्ये ठेकेदारासोबत अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. इंदापूर ते कशेडी या 77 किमीच्या दुसऱ्या टप्याचे काम एल एन्ड टी कंपनीला देण्यात आलेले आहे. या महामार्गावर भूसंपादन झालेले असले तरी काही शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्याचे कामही अजून रडतखडत सुरू असल्याने जिल्ह्यातून जाणाऱ्या पळस्पे ते कशेडी हा महामार्ग खड्डेमयच राहिला असल्याने चाकरमानी व प्रवाशांना सुस्थितीत रस्त्यावरून प्रवास करण्यास कधी मिळणार याचे कोडे अजून सुटलेले नाही.

जिल्ह्यातुन जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुर्दशेमुळे पर्यटन क्षेत्रावरही मोठा परिणाम झालेला आहे. जिल्ह्यात विस्तीर्ण असा समुद्र किनारा, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, नैसर्गिक सौन्दर्य असा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटन जिल्हा असल्याने लाखो पर्यटक पर्यटनास येत असतात. मात्र खड्डेमय रस्त्यामुळे पर्यटकही येण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळेही आर्थिक संकटात आलेली आहेत. जिल्ह्यात नवीन नवी उद्योग प्रकल्प येत आहेत. मात्र दळणवळणाची सुविधा कोलमडली असल्याने जिल्ह्याचे नुकसान होत आहे. नवीन प्रकल्प येण्याने स्थानिकांना रोजगाराची संधी भेटण्याची आशा आहे. मात्र मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरण कामामुळे ही संधीही बेरोजगार तरुणांची जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडणार आहे. मात्र ठेकेदार व नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्याचा विकास खुंटत चालला आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.