
तळा हायस्कूलच्या मैदानावर ग्रामपंचायतीने घंटागाड्यांचे बेकायदा ‘पार्किंग’ केले आहे. त्यात आता पाण्याची टाकी बांधण्यासाठी कंत्राटदाराने या मैदानात अस्ताव्यस्त साहित्य ठेवले असून खिळे, शिगा तसेच पत्र्यांमुळे विद्यार्थ्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे. याबाबत पालकांनी आवाज उठवूनही कानाडोळा केला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
गो. म. वेदक विद्यालयाचे मैदान हे शहराच्या मध्यस्थानी असल्याने त्या ठिकाणी विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम पार पडतात. तसेच वेदक विद्यालयासह जवळच असलेल्या जिल्हा परिषदेतील विद्यार्थीदेखील याच मैदानात खेळण्यासाठी येतात. मात्र ठेकेदाराने या मैदानावर अतिक्रमण केल्याने त्यांना खेळण्यासाठी जागाच उरलेली नाही. मैदानाच्या शेजारी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी लागणारे लोखंडी पत्रे, खिळे, लाकडी फ्रेम, सळई, रेती, खडी व इतर साहित्य या ठेकेदाराने उघड्यावर ठेवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुखापत होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
उघड्यावरील साहित्य व खासगी वाहने हटवा
शाळेच्या मैदानात ठेकेदाराचे अतिक्रमण, नगरपंचायतीच्या घंटागाड्या व स्थानिक नागरिकांनी खासगी वाहने पार्क केल्याने मुलांना खेळण्यासाठी जागाच उरलेली नाही. त्यामुळे तळा नगरपंचायतीने मैदानावरील अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे आणि ते मैदान मुलांना खेळण्यासाठी मोकळे करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.





























































