
सुविधांचा अभाव आणि गैरसोयींमुळे रायगडातील एसटी प्रवासी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. मात्र या समस्यांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात येताच संतप्त शिवसैनिकांनी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एसटी विभाग नियंत्रण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी प्रवाशांच्या समस्या तत्काळ सोडवा अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.
रायगड आगारासह ग्रामीण पट्ट्यातून दररोज हजारो प्रवासी शेगाव, तुळजापूर, पंढरपूर, सातारा, महाबळेश्वर, भगवानगड, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, पुण्याचा प्रवास करतात. मात्र या लांबपल्ल्याच्या गाड्यांची दुरवस्था झाली असून त्या खिळखिळ्या झाल्या आहेत. जुन्या गाड्या वापरात काढल्याने त्या गाड्या रस्त्यातच नादुरुस्त होत आहेत. एसटीच्या या कंबरतोड
प्रवासामुळे प्रवासी कंटाळले आहेत. नागरिकांच्या या समस्या दूर करण्यासाठी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी एसटी नियंत्रण कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. एसटी महामंडळाच्या समस्यांचा पाढा वाचत त्या तातडीने सोडवण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी पेण तालुकाप्रमुख समीर म्हात्रे, उपतालुकाप्रमुख चेतन मोकळ, तालुका सहसंपर्कप्रमुख भगवान पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम म्हात्रे, योगेश पाटील, दीपक पाटील, संजय भोई आदी उपस्थित होते.





























































