चला चला.. वळगण आली रे… पहिल्याच जोरदार पावसाने वळगणीचे मासे पकडण्यासाठी झुंबड

रायगड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या पहिल्याच आणि जोरदार पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले असले तरी मासे खवय्यांना मात्र मोठा लाभ झाला आहे. या पहिल्याच पावसात वाहणाऱ्या नदी, नाल्यातून वळगणीचे मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत शेतात, ओहोळात शिरले आहेत. चला चला.. वळगण आली रे.. अशी हाकाटी देत गावकरी, बच्चे कंपनी, आदिवासी झिले, मच्छरदाण्या आणि मासेमारीचे पाग घेऊन वळगणीचे मासे पकडत आहेत. चविष्ट असणाऱ्या या माशांवर खवय्यांच्या उड्या पडत आहेत.

पहिल्याच जोरदार पावसाने खरबे, मळे, निवट्या, पितोळ्या, शिवडा, खवल, दांडाळी, बाम, पांडरुस अशा वळगणीच्या माशांनी प्रवाहाच्या दिशेने उसळ्या मारल्या आहेत. पोटात असलेली अंडी सोडण्यासाठी हे मासे प्रवाहाच्या विरुद्ध पोहत ओहोळ आणि शेतात शिरतात. अत्यंत चविष्ट असणारी ही वळगण पकडण्यासाठी रायगड जिल्ह्यातील गावागावांत गावकरी विशेषतः गाठीला दोन पैसे मिळवण्यासाठी आदिवासी ही वळगण जाळ्यात धरण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत. ग्रामीण भागात वळगणीच्या माशांना त्यांच्यातील अंड्यांमुळे मोठी मागणी असते. असाच पाऊस सुरू राहिला तर पुढचे चार ते पाच दिवस खवय्यांना वळगणीच्या माशांवर ताव मारता येणार आहे.

अशी पकडतात वळगण
रायगडात पेण, रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर या तालुक्यांत वळगणीचे मासे मोठ्या प्रमाणावर पकडले जातात. वळगण पकडण्याची विशिष्ट पद्धत आहे. नदीला जोडलेल्या छोट्याशा ओहोळावर बसून पागीर टाकत हे मासे पकडले जातात. तर अनेकदा उंचावरून खाली पडणाऱ्या मोरीच्या प्रवाहाजवळ ‘झिला’ लावून हे मासे पकडले जातात. एका तासाने झिला काढून जमलेले मासे गोळा केले जातात.

मळ्याची चवच भारी
गोड्या पाण्यातील चवदार, लज्जतदार वळगण म्हणजे मळ्याचे मासे. रायगडातील खवय्यांची हे मासे पहिली पसंती आहे. आदिवासी आणि मच्छीमार टोपलीतून ही मासळी आणतात तेव्हा अवघ्या पाच मिनिटांत अख्खी टोपली विकली जाते. 180 ते 200 रुपये किलोने मळ्याचे मासे विकले जातात.

पावसाळ्यात मिळणाऱ्या अंड्यांनी भरलेल्या वळगणीच्या माशांना मोठी मागणी असते. अवघ्या काही तासांत हे मासे विकले जातात. त्यामुळे आम्हाला चांगला रोजगार मिळतो.
गोऱ्या चव्हाण (आदिवासी)