
रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला असून अनुसूचित जमाती महिला या आरक्षणासाठी राखीव असणाऱ्या अध्यक्षपदासाठी शेकापच्या पनवेल तालुक्यातील वावंजे गटातून निवडून आलेल्या योगिता पारधी यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत तालुक्यातील बीड गटातून निवडून आलेले सुधाकर घारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भरत शितोळे यांनी जाहीर केले. यावेळी प्रांताधिकारी शारदा पोवार, उपमुख्यकार्यकरी अधिकारी प्रकाश खोपकर, सर्व सदस्य, पंचायत समिती सभापती उपस्थित होते.
2017 साली झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन ते सत्तेवर आले. शेकापने त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद दिले. अदिती तटकरे अध्यक्ष तर शेकापचे अॅड. आस्वाद पाटील उपाध्यक्ष झाले. अडीच वर्षे कार्यकाल संपल्यानंतर अध्यक्षपद शेकापकडे आले. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत योगिता पारधी यांची अध्यक्षपदी तर सुधाकर घारे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष पदासाठी योगिता पारधी तर उपाध्यक्ष पदासाठी सुधाकर घारे यांनी आपले अर्ज निवडणूक अधिकारी भरत शितोळे यांच्याकडे दाखल केले. शिवसेनेने आपले उमेदवार दिले नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी भरत शितोळे यांनी योगिता पारधी आणि सुधाकर घारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. योगिता पारधी आणि सुधाकर घारे यांची अध्यक्ष, उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्याचे सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
























































