रेल कामगार सेनेने ट्रॅकमनच्या विविध समस्यांचा वाचला पाढा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे ट्रॅकमनना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांसंदर्भात सोमवारी रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांची भेट घेतली. ट्रॅकमनच्या समस्यांवर लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन यावेळी महाव्यवस्थापकांकडून देण्यात आले.

रेल कामगार सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच विनायक राऊत यांनी मध्य रेल्वे मुख्यालयाला भेट दिली. विशेषतः रेल्वेवर काम करणाऱ्या ट्रॅकमनच्या विविध समस्यांबाबत त्यांनी महाव्यवस्थापकांसोबत चर्चा केली. परळ वर्कशॉपसाठी असणारा 10 टक्के आणि 40 टक्के कोटा कसा सोडणार, त्याचबरोबर यासाठी 2016 पासून ज्या ट्रॅकमननी प्रमोशन घेतले नाही त्याबाबत योग्य विचार व्हावा. तसेच ट्रॅकमनना दुसऱ्या विभागात स्थानांतरणासाठी खूपच त्रास होत आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महाव्यवस्थापकांनी या गोष्टीवर मी लवकर योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. त्याचबरोबर मध्य रेल्वेत ट्रॅकमनच्या खूप जागा रिक्त असल्याने रेल्वे बोर्डाने त्या लवकर भराव्यात हेदेखील सांगितले.

यावेळी रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव, खजिनदार स्वप्नील झेम्से, जनार्दन देशपांडे, नरेश बुरघटे, योगेश जाधव, चंद्रकांत विनारका, अर्जुन जमखींदिकर, नीलेश कदम, प्रतीक गायकर, राजा कुट्टी, सुनील आघाव, सुनील पवार, लाजेश कोरगावकर, मयेकर, महिला आघाडी सरचिटणीस सोनाक्षी मोरे, मंजुषा माते, संगीता सोनवणे, सुषमा गुजर, बी. बी. शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

परळ स्थानकावर सरकते जिने लावा     

याशिवाय विनायक राऊत यांनी मुंबई मंडळाचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांचीही भेट घेतली. मुंबईस्थित अनेक रुग्णालये ही परळजवळ असल्याने परळ मध्य रेल्वेवर मुंबई साईडला लवकर सरकते जिने किंवा लिफ्ट बसवण्यात यावी, अशी मागणी राऊत यांनी केली. हे काम लवकर करू असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच मध्य रेल्वेचे मुख्य सतर्कता अधिकारी गोस्वामी यांनी भेटून विजिलन्स विभाग विनाकारण कमर्शिअल विभागातील लोकांना त्रास देत असल्याबद्दल राऊत यांनी नाराजी व्यक्त केली तसेच याप्रकरणी पारदर्शक कारवाईची मागणी केली.