
एकीकडे लॉकडाऊनमुळे मुलांच्या शाळा ऑनलाईन सुरू असताना उपनगरीय लोकल सेवेचा मोठा पसारा ज्यांच्या हाती सुरक्षित आहे, त्या मोटरमन आणि गार्ड्सना गेल्या दोन महिन्यांपासून घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जात आहे.
कोरोना साथीच्या अटकावासाठी 25 मार्चपासून देशभर लॉकडाऊन घोषीत करण्यात आल्याने उपनगरीय लोकल सह रेल्वेची प्रवासी सेवा ठप्प करण्यात आली. सध्या ‘अनलॉक 1.0’ जरी सुरू असले तरी रेल्वेच्या फेर्या मर्यादित असल्याने मध्य रेल्वेने कुर्ला येथील मुंबई मोटरमन ट्रेनिंग सेंटरद्वारे मोटरमन आणि गार्ड्स घरबसल्या ऑनलाईन प्रशिक्षण सुरू केले आहे.
असे आहेत अभ्यासक्रम
21 दिवसांचा रिफ्रेशर ट्रेनिंग कोर्स, 10 आठवड्यांचा प्रमोशनल कोर्स, एक दिवसाचा इंटेन्सीव्ह कोर्स असे तीन अभ्यासक्रम ऑनलाईन घेण्यात आले. प्रत्येक अभ्यासक्रमातील मोड्यूलमध्ये ऑनलाइन वर्ग, प्रशिक्षण तसेच प्रॅक्टिकल प्रशिक्षणाचा समावेश आहे. प्रॅक्टिकल प्रशिक्षणात प्रत्यक्षात ट्रेनमध्ये तीन मोटरमनच्या एका बॅचला प्रशिक्षण दिले जाते.
247 मोटरमनने प्रशिक्षण पूर्ण केले
8 मे ते 13 जून 2020 या कालावधीत 162 प्रशिक्षणार्थींना एक दिवसीय ‘इंटेन्सीव्ह कोर्स’ प्रशिक्षण देण्यात आले. दररोज 10 प्रशिक्षणार्थी घरातून थेट ऑनलाइन प्रशिक्षण वर्गात सहभागी होतात. इतर ऑनलाईन अभ्यासक्रमांत 85 कर्मचा-यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या दोन महिन्यांत एकूण 247 मोटरमनने प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
एक मोटरमन रोज 300 सिग्नलवर लक्ष ठेवतो
या ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमात मोटरमन आणि गार्ड यांचे ज्ञान अद्ययावत केले जाते, ‘स्पॅड’ एसपीएडी (सिग्नल पासिंग अॅट डेंजर) आणि प्लॅटफॉर्म ओव्हरशूटींग टाळण्यासाठी हे प्रशिक्षण उपयोगी असते. तसेच येणा-या पावसाळ्यासाठी त्यांना अर्लट ठेवले जाते. मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागातील कर्तव्यावरील प्रत्येक मोटरमन दररोज सरासरी 300 सिग्नलवर लक्ष पुरवत असतो.
ऑनलाईन प्रशिक्षण का गरजेचे
– हे ऑनलाईन मॉड्यूल मुंबई डिव्हीजनच्या विविध ट्रेनच्या तांत्रिक समस्यांवर उपाय, ऑपरेटिंग तांत्रिक ज्ञान, सुरक्षा आदीबाबत मोटरमनना अद्ययावत करते. त्यामुळे लोकल आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अधूनमधून प्रशिक्षण आणि ज्ञान अद्ययावत करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
1,774 उपनगरीय लोकल फेर्या
– मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे एका दिवसात सुमारे 1,774 उपनगरीय लोकल फेर्या चालविल्या जातात. रक्षाबंधन, होळी, दसरा आणि इतर सणांच्यावेळी मुंबईकर आपल्या लाडक्या लोकलला एखाद्या नवरीप्रमाणे सजवतात तिच्या प्रती विशेष आदर व्यक्त करतात. आपल्याला काळजीपूर्वक मुक्कामी पोहोचविणाऱ्या मोटरमन दादांचा आभार मानतात!





























































