
13 वर्षांपूर्वी रेल्वे प्रवासात चोरीला गेलेले तीन तोळे सोने असा मुद्देमाल घेण्यासाठी व्यावसायिक मोईस वल्ली मोहम्मद यांनी थेट दुबईहून मुंबई गाठली. चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. मुद्देमाल परत मिळाल्याने त्यांनी रेल्वे पोलिसांच्या कामाचे कौतुक केले.
रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विविध उपक्रम हाती घेतले. गुह्यातील मुद्देमाल तक्रारदारांना देण्याकरिता त्यांनी विशेष मोहीम हाती घेतली. दिवाळीच्या मुहूर्तावर रेल्वे पोलिसांनी गुह्यातील मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम आज आयोजित केला होता. या कार्यक्रमात 60 जणांचा मुद्देमाल त्यांना परत करण्यात आला.
विशेष म्हणजे मुद्देमाल घेण्यासाठी मोईस अली हे थेट दुबईहून मुंबईत आले. 13 वर्षांपूर्वी मोईस हे गोल्डन टेम्पल एक्स्प्रेसने प्रवास करत होते. प्रवासात चोरटय़ांनी त्याची बॅग चोरली. त्या बॅगेत 3 तोळ्यांच्या बांगडय़ा आणि वस्तू होत्या. चोरीप्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी तपास करून आरोपीला गजाआड केले होते. त्यांचा मुद्देमाल परत देण्याकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांच्या पथकातील पोलिसांनी मोईसचा पत्ता शोधून काढला. भायखळा येथील मोईसच्या नातेवाईकापर्यंत पोलीस पोहचले. नातेवाईकांनी दिलेल्या नंबरवरून पोलिसांनी मोईसशी संपर्क साधला. मुद्देमाल परत करण्याबाबत पोलिसांनी फोन केल्यावर मोईस यांना धक्काच बसला. त्यांना शुक्रवारी सुट्टी असल्याने ते थेट दुबईहून मुंबईत आले.
त्याचप्रमाणे गुजरात येथील रहिवासी असलेल्या प्रभोदिनी बेन रिचर्ड यांची 95 साली सोन्याची चेन चोरीला गेली होती. चोरीला गेलेली सोन्याची चेन परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
47 लाखांचा मुद्देमाल परत
आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलिसांनी 60 जणांना त्यांचा मुद्देमाल परत केला. सुमारे 47 लाख रुपये रोख आणि 1 किलो 300 ग्रॅम सोने परत करण्यात आले. येत्या दोन महिन्यांत उर्वरित मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात येईल तर मुंबई सेंट्रल रेल्वेचे मुद्देमाल कक्षाचे उपनिरीक्षक शामराव चव्हाण यांनी 449 प्रलंबित मुद्देमाल तक्रारदारांना दिला त्याचे आयुक्त सेनगावकर यांनी कौतुक केले.




























































