
>> दयानंद पाटील
पश्चिम रेल्वेचे उपनगरीय कार्यक्षेत्र चर्चगेट ते डहाणू असे असूनही विरारनंतरचा म्हणजे वैतरणा ते डहाणू हा विभाग अत्यंत दुर्लक्ष करण्यात आलेला असा विभाग आहे असे म्हणावे लागेल आणि याची प्रचीती फार पूर्वीपासूनच प्रवाशांना आली आहे. डहाणू विभागातील प्रवाशांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले आहे आणि आजही जावे लागत आहे.
डहाणू विभागातील रेल्वे समस्या सोडविण्यासाठी पूर्वी कशा प्रकारे झगडावे लागले याचा संपूर्ण इतिहास मांडावयास गेल्यास एक मोठा लेख तयार होईल. डहाणू लोकलसाठी जनतेला न्यायिक मार्गाने आंदोलनात उतरावे लागले होते. खऱया अर्थाने हायकोर्टाच्या आदेशानेच डहाणू लोकल सुरू झाली होती, अन्यथा आजही सुरू झाली नसती. त्यामुळे डहाणू विभागातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवायच्या झाल्यास पुन्हा एकदा न्यायालयात धाव घ्यावी का? असा प्रश्न सर्व प्रवाशांना पडला आहे. कारण रेल्वे प्रशासन आता रेल्वे संघटनांनासुद्धा जुमानत नाही.
डहाणू विभागातील प्रवाशांसाठी नेहमीच कार्यरत असलेली ‘डहाणू- वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था’ न्यायिक मार्गाने आपले विषय रेल्वे दरबारी मांडत आली असून संस्थेच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथील रेल्वे बोर्डाची 22 एप्रिल 2022 रोजी भेट घेतली होती. डहाणू लोकल सुरू होऊन 16 एप्रिल 2023 रोजी 10 वर्षे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून वैतरणा ते डहाणूपर्यंतच्या सर्व स्थानकांतील प्रवाशांची स्वाक्षरी मोहीम पार पाडून ती निवेदने रेल्वे मंत्रालय, रेल्वे अधिकारी आणि राजकीय मंडळींनाही देण्यात आली. तसेच पश्चिम रेल्वेच्या DRM आणि महाव्यवस्थापकांच्या अनेक भेटी घेतल्या आणि या भेटीअंती रेल्वेची नेहमीच नकारघंटाच असायची, परंतु राजकीय मंडळी जेव्हा भेटी घेतात तेव्हा सकारात्मक आश्वासने त्यांना दिली जातात. कदाचित रेल्वे प्रशासन राजकीय मंडळींना ‘देखल्या देवास दंडवत’ त्याप्रमाणे वेळ मारून नेत असावेत किंवा प्रत्यक्षात खरे कोण बोलते हेही समजण्याची वेळ आली आहे.
डहाणू विभागातील प्रमुख समस्या आणि मागण्या खालीलप्रमाणे.
– गर्दीच्या वेळेस सकाळ, संध्याकाळ डहाणू लोकांच्या फेऱया वाढविण्यात याव्यात.
– कोरोना काळात बंद करण्यात आलेली डहाणू येथून सकाळी 7.05 ला सुटणारी लोकल सुरू करावी. जी 7.05 ऐवजी डहाणू येथून सकाळी 6.50 ला सोडली तरी चालू शकते.
– 19015-16 सौराष्ट्र एक्स्प्रेसच्या जुन्या वेळात बोरिवली येथून डहाणूसाठी लोकलची एक अतिरिक्त फेरी सुरू करावी.
– रात्रीची 19425-26 मुंबई-नंदुरबार पॅसेंजरला वैतरणा स्थानकात थांबा देण्यात यावा. जो फक्त 30 सेपंदांचा असला तरी चालू शकतो.
– 22927-28 लोकशक्ती एक्स्प्रेसचा सफाळे येथील रद्द केलेला थांबा त्वरित पुन्हा सुरू करावा.
– दादर-डहाणू लोकल पुन्हा पूर्वीसारखी सुरू करण्यात यावी. जी आता दोन टप्प्यांत सुरू आहे (90639 दादर-विरार दादरहून संध्याकाळी 4.50 ला सुटून विरारला पोहोचल्यानंतर 15 मिनिटे विरारला थांबून 93029 बनून विरार-डहाणू अशी विरार येथून संध्याकाळी 6.05 ला सुटते). प्रत्यक्षात या लोकलची उद्घोषणा आजही दादर स्थानकात डहाणू लोकल अशी होत नसल्याने संभ्रमाची स्थिती असते आणि दादरहून थेट येणाऱया डहाणू प्रवाशांना गैरसोयीचे ठरते.
– वैतरणा ते डहाणूदरम्यानच्या सर्व स्थानकांत एक्सलेटरची व्यवस्था ताबडतोब करण्यात यावी.
अशा अनेक समस्या आहेत आणि येत्या नोव्हेंबरमध्ये पश्चिम रेल्वेचे नवीन वेळापत्रक येणार आहे. त्यात डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढीबाबत कसा निर्णय घेण्यात येईल हे पहावे लागेल आणि हे नवीन वेळापत्रक तयार करण्याची आखणी सध्या सुरू आहे. त्यादृष्टीने या राजकीय मंडळींनी पुन्हा एकदा पाठपुरावा करावा अशी अपेक्षा असून हे कार्य युद्धपातळीवर प्रत्यक्ष कृतीत अमलात आणावे हीच सर्व प्रवाशांची अपेक्षा आहे.




























































