पोस्ट ऑफिसमधून काढता येणार रेल्वे तिकीट; प्रवाशांना दिवाळी भेट, देशभरात 333 टपाल कार्यालयांमध्ये बुकिंग सुविधा

ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोक आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून रेल्वेचे तिकीट काढू शकतात. जिथे रेल्वे स्टेशन दूर आहे किंवा ऑनलाईन बुकिंगला मर्यादा आहे, तिथे नवी सुविधा उपयुक्त ठरेल. दिवाळी किंवा छटपूजा यांसारख्या उत्सवांत प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने ही गुड न्यूज दिली आहे.

टपाल खात्याने देशभरातील 333 पोस्ट खात्यांमध्ये पीआरएस टर्मिनल लावून तिकीट बुकिंगची सुविधा सुरू केली आहे. यामध्ये जनरल, स्लीपर, एसी अशा सर्व प्रकारच्या रेल्वे तिकिटांचे बुकिंग करता येईल. ‘रेल्वे-तिकीट-पोस्ट-ऑफिस’ या नवीन प्रणालीअंतर्गत, प्रवासी स्लीपर, एसी आणि जनरलसह सर्व वर्गांसाठी तिकिटे बुक करू शकतात. ही योजना प्रवाशांसाठी मोठी दिलासा देणारी ठरेल, ज्यांना आता तिकिटे बुक करण्यासाठी शहरांमध्ये किंवा रेल्वे काऊंटरवर जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

कसे बुकिंग कराल?

z  प्रवाशांना आता रेल्वे तिकिटे बुक करण्यासाठी स्टेशनवर जाण्याची आवश्यकता नाही. जर तुमच्या परिसरात पीआरएस टर्मिनल असलेले पोस्ट ऑफिस असेल, तर तुम्ही तेथून तिकिटे बुक करू शकता.

z  प्रवाशांनी प्रथम त्यांच्या क्षेत्रातील कोणते पोस्ट ऑफिस पीआरएसशी संलग्न आहे हे ठरवावे. कारण ही सुविधा फक्त निवडक पोस्ट ऑफिसमध्येच उपलब्ध आहे.

z  तुम्ही रोख किंवा डिजिटल पेमेंट वापरून पैसे देऊ शकता. पूर्ण झाल्यानंतर तुमचे तिकीट जागेवरच छापले जाईल. हे एक वैध रेल्वे तिकीट असेल, ज्यामुळे तुम्ही नियमित तिकीट म्हणून प्रवास करू शकाल.

z  तथापि, ही सुविधा विशेषतः गावांमध्ये किंवा लहान शहरांमध्ये राहणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे, ज्यांना रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यात अडचण येते.

अयोध्येसाठी स्पेशल फ्लाइटस्

देशभरात सध्या फेस्टिव्हल सीझन सुरू आहे. स्पाइस जेटने आपल्या प्रवाशांसाठी खास स्पेशल फ्लाइटस्ची घोषणा केली आहे. स्पाइस जेट कंपनीने अयोध्येसाठी स्पेशल फ्लाइट्स सुरू केली आहे. आता दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद आणि बंगळुरूहून अयोध्येसाठी दररोज नॉन स्टॉप फ्लाइट उपलब्ध आहे. या फ्लाइट्स खास करून दिवाळीच्या सुट्टीत अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दरम्यान, यासोबत स्पाइसजेट विमान कंपनीने छटपूजेसाठी बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठीही खास फ्लाइट्स सुरू केल्या आहेत. अहमदाबाद, बंगळुरू आणि हैदराबाद शहरातून पटणासाठी खास उड्डाण सुरू केले आहेत. दिल्ली आणि मुंबईतूनही पटणासाठी खास विमान उड्डाण सेवा सुरू आहे. बिहारच्या दरभंगासाठी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूहून अतिरिक्त उड्डाणे सुरू केली आहेत.