
सामना ऑनलाईन । मुंबई
रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण येथील दामोदरचार्य हॉल येथे रनिंग स्टाफ मुंबई विभागाचे वार्षिक अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. मुंबई विभागातील रनिंग स्टाफ बहुसंख्येने या अधिवेशनामध्ये उपस्थित होता.
यावेळी मार्गदर्शन करताना रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी यांनी रेल कामगार सेनेने केलेल्या विधायक कार्याचा उल्लेख केला. सरचिटणीस दिवाकर देव यांनी स्पॅडमधील मोटरमन आणि रनिंग स्टाफला यापुढे जाचक शिक्षा होणार नाही आणि खासदारांनी त्याबद्दल संसदेत आवाज उठवावा अशी मागणी केली. जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी रेल कामगार सेनेमुळे कामगार एकजूट असल्याचे सांगितले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी गँगमनचा प्रश्न संसदेत उचलल्यामुळे त्यांना रिस्क अलाऊन्स मिळाला असे सांगून यापुढील संसदेच्या अधिवेशनात रनिंग स्टाफच्या समस्या मांडून स्पॅडसंबंधी योग्य तो निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन दिले. यावेळी शिबीरप्रमुख तुकाराम कोरडे, महापौर विजया राणे, संयुक्त सरचिटणीस नरेंद्र शिंदे, सचिव चंद्रकांत विनरकर, नगरसेवक प्रकाश पेणकर, सचिव प्रशांत कमाणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या अधिवेशनात लोको इन्स्पेक्टर आणि वरिष्ठ कार्मिक नियंत्रक यांचा सत्कार करण्यात आला. रनिंग स्टाफ प्रमुख योगेश जाधव यांचा उत्तम कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसप्रणीत सीआरएमएसचे शहाड ते कसारा शाखेचे सचिव मधुकर गायकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह रेल कामगार सेनेत प्रवेश केला. तसेच बुकिंग क्लार्क जीतेंद्र भालेराव यांनीही रेल कामगार सेनेत प्रवेश केला. हिंदुस्थानातील पहिली महिला मोटरमन सुरेखा यादव-भोसले यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला रेल कामगार सेनेचे केंद्रीय कार्यकारिणी खजिनदार स्वप्नील झेमसे, सहकार्याध्यक्ष राजू पाटोळे, जनार्दन देशपांडे, राजन श्रावणकुमार, बंडू शृंगारपुरे, विकास दुसाने, सुरेश परदेशी, नरेंद्र तळेकर, कोकण रेल्वेचे सचिव राजू सुरती उपस्थित होते.



























































