रेल्वेतील कर्मचाऱयांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा द्या, रेल कामगार सेनेची आग्रही मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेमधील कायम कार्यरत असलेल्या रनिंग स्टाफ (ड्रायव्हर, मोटरमन, गार्ड), ट्रकमॅन, कमर्शिअल बुकिंग क्लार्क तसेच इतर अन्य स्टाफला फ्रंटलाइन वर्कसचा दर्जा द्यावा, अशी आग्रही मागणी रेल कामगार सेनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी नुकतीच केली.

या मागणीसाठी रेल कामगार सेनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली एका शिष्टमंडळाने नुकतीच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भेट घेत वरील मागणी केली. यावेळी रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव(बाबी) आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सेनेतेर्फे त्यांच्या विविध मागण्यांचे एक निवेदनदेखील कुंटे यांना दिले.

या बैठकीत कोकण रेल्वेमध्ये मान्यताप्राप्त संघटनसाठी होणाऱया निवडणुका लवकरात लवकर कशा प्रकारे घेऊ शकतो यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तर पावसाळय़ाआधी या निवडणुका घेण्यासाठी मान्यता द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक कांसल यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्राचा संदर्भदेखील देण्यात आला. तर रेल्वे कर्मचाऱयांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा दिल्यास 18 ते 44 वर्षे असलेल्या सर्व रेल्वे कामगारांना लस देण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास सरचिटणीस दिवाकर देव यांनी व्यक्त केला.