
आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी रेल्वे अडवून रेल्वे रुळावर टायर जाळून राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच आरक्षण लवकरात लवकर मिळावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी ‘गेल्या 15 दिवसात 10 समाज बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आपले आत्महत्या करत बलिदान दिले आहे. तसेच आजपर्यंत मराठा सामाजातील 50 बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले असून मराठा समाजातील बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण दिली असून समाज बांधवांनो आत्महत्या न करता मराठा आरक्षणाचा लढा मोठ्या प्रमाणात उभा करा’, असं आंदोलकांनी आवाहन केलं.
सरकारनं लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि समस्त मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. अन्यथा येणाऱ्या काळात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सत्ताधारी आमदार खासदार व विरोधी पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. त्यांच्या अंगावरील कपडे फाडून नग्न करू, असा गंभीर इशारा देखील देण्यात आला.
‘अजूनही वेळ गेली नाही मराठ्यांच्या युवकांचा अंत पाहू नका परिणाम गंभीर होतील’, असं मनोगत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राम भैय्या जाधव यांनी व्यक्त केलं.
मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राम भैय्या जाधव, मारुती सुरवसे, निशांत सावळे, श्रीनिकेत सुरवसे आदी समाज बांधव उपस्थित होते.































































