
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईकरांच्या प्रवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ पर्याय समोर येत असून आता मुंबई-ठाणे दरम्यान भुयारी रेल्वे मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव प्रशासनासमोर आहे. नव्या रेल्वे मार्गासाठी पुरेशी जागा नसल्याने भुयारी मार्गाचा पर्याय पुढे आला असून मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते ठाणे भुयारी जलद मार्गाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे.
सध्या मुंबई सीएसएमटी ते ठाणे या प्रवासासाठी जलद रेल्वे मार्गावरून 40 मिनिटे लागतात. सीएमएटीनंतर भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड आणि ठाणे अशी रेल्वे स्थानके लागतात. मात्र भुयारी रेल्वे मार्गावर भायखळा रेल्वे स्थानक नसेल, तसेच मुलुंड ऐवजी भांडुप रेल्वे स्थानक असेल, असे या प्रस्तावात असल्याचे इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तात म्हटले आहे. मुंबई मध्य रेल्वेला समांतरच हा मार्ग असेल असेही वृत्तात म्हटले आहे.
कोकण रेल्वेचे जनक आणि ‘मेट्रोमॅन’ म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांनी उपनगरीय रेल्वेला नवीन मार्ग म्हणून भुयारी रेल्वे मार्गाचा पर्याय निवडावा, रेल्वे मंत्रालयाला सूचवले होते. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने याबाबत ‘एमआरव्हीसी’ला विचारणा केली. त्यानुसार ‘एमआरव्हीसी’ने दिल्ली मेट्रो रेल कॉपरेरेशनच्या मदतीने मध्य रेल्वेवरील प्रस्तावित भुयारी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण केले. त्यानुसार ‘सीएसएमटी’ ते ठाण्यापर्यंत भुयारी रेल्वे मार्ग शक्य असल्याचे स्पष्ट झाले.
34 किमी अंतराच्या या भुयारी रेल्वे मार्गासाठी 16 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे यामध्ये म्हटले आहे. यामध्ये राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय 50:50 खर्च करण्यासंदर्भात या प्रस्तावात म्हटले आहे.


























































