माजलगाव तालुक्यात पावसाने हाहाकार; घरांची पडझड, वीज पडून दोघे ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुधीर नागापुरे, माजलगाव

माजलगाव तालुक्यात शुक्रवारी अचानक सांयकाळ पासून रात्री अकराच्या दरम्यान मान्सूनच्या पहिल्या पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळ, वारा, विजेचा कडकडाटासह जोरात पाऊस झाल्याने दोघांचा वीज पडून मृत्यू झाला तर तालुक्यातील कित्येक गावात घरावरील पत्रे उडून त्यावरील दगड अंगावर पडल्याने शेकडो लोक जखमी झाले. या लोकांनी घरातील पलंग-बाजाचा आधार घेतल्याने लोकांचे प्राण वाचले. सात हजार लोकसंख्या असलेल्या गंगामसला गावात हाहाकार उडाला झाडे मोडून पडली. विजेचे खांब वाकून, तारा तुटल्या. घराघरावरील पत्रे उडून गेले तर भिंती पडल्या. तसंच चारचाकी व दुचाकी या वाहनांचेही अवकाळी पावसात प्रंचड नुकसान झाले आहे.

शुक्रवारी अचानक वादळवाऱ्यासह, विजेचा कडकडाट सह जोरात पाऊस झाल्याने गाव व गावाबाहेर असलेल्या वस्त्यांमध्ये हाहाकार उडाला. घरावरील पत्रे, पाण्याच्या टाक्या, सोलार, डिश आदींचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर गावातील पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाडी, प्राथमिक शाळा या वरील पत्रे उडून गेले, भिंती पडल्या. या गावात घरांवरील पत्रे उडाले, त्यामुळे त्यावरील ठेवलेले दगड घरात लोकांच्या अंगावर पडल्याने कित्येक जण जखमी झाले आहेत. शिवसेना माजी तालुकाप्रमुख सतीश सोळंके यांनी तातडीने पालकमंत्री तसेच प्रशासनाशी संपर्क साधून मदतीचे आव्हान केले आहे. तेथे मंडळ अधिकारी, तलाठी दाखल झाले आहेत.

शहरापासून जवळच असलेल्या भाटवडगाव येथेही वादळाने गावातील शंभर पेक्षा जास्त घरावरील पत्रे उडाले आहेत. या घटनेत शेख मुन्नबी, शेख रूस्तुम, शेख सानिया, शेख महेमुदाबी, शेख नवाब, सकलादी भानुदास पटेकर, अरूण प्रदिप साळवे पाचजण जखमी झाले आहेत तर दोन शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. म्हशी, गाय, बैल जखमी झाले आहेत. नागडगाव येथे शेतातून परतणाऱ्या अंजली भिमराव खामकर (25) या महिलेवर वीज पडून मृत्यू झाला तर महातपुरी येथे विजेचा धक्का लागल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. भाटवडगाव येथे पाच ग्रामस्थ जखमी झाले. दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. खरात आडगाव येथे बाबा गिराम यांची पत्नी व मुले जखमी झाली. माजलगाव शहरातदेखील विविध भागात झाडे तुटली. त्यामुळे वीज पुरवठा खंडित असून तब्बल चोवीस तास उलटले तरी वीज गायब आहे. त्यामुळे लोक उकाड्याने हैराण झाले आहेत.