कोल्हापुरात पावसाचा जोर किंचित ओसरला, सांगलीत पावसाची उघडीप

जिल्ह्यात तीन-चार दिवसांपासून कोसळणाऱया संततधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे सर्वांची दैना उडाली असतानाच, दोन दिवसांपासून पावसाचा जोर किंचित ओसरल्याने पात्राबाहेर पडलेल्या नद्यांच्या पातळीत घट होऊ लागली आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात 7 ते 8 इंचाने कमी झाली होती, तर 41 बंधारे पाण्याखाली राहिले होते. गेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 63 मि.मी. पावसाची नोंद झाली.

संततधार पावसाचा जोर आज दुसऱया दिवशीही कमी राहिला. त्यामुळे नद्यांच्या पातळीतही घट झाली असली, तरी अजूनही नद्यांचे पाणी पात्राबाहेरच आहे. सकाळी आठच्या सुमारास 34 फूट 1 इंचावर असलेली पातळी सायंकाळी सहाच्या नोंदीनुसार 33 फूट 5 इंच झाली होती, तर सकाळी 44 बंधारे पाण्याखाली होते. सायंकाळी 41 बंधारे पाण्याखाली राहिले होते. राधानगरी धरणात 87.31 दलघमी पाणीसाठा असून, आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1 हजार 300 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होता. कोयना धरणात 38.71, तर कर्नाटकातील अल्लमट्टी धरणात 51.407 टीएमसी पाणीसाठा होता.

सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप

जिल्ह्यात आज पावसाने उघडीप दिल्याने नदीकाठच्या लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही घट होत आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत होती. परिणामी पुराच्या भीतीने नदीकाठचे लोक धास्तावले होते. परंतु, आज दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने कृष्णेच्या पाणीपातळीत झपाटय़ाने घट होत आहे. सांगलीतील आयर्विन पुलाजवळ 21 फुटांवर पोहोचलेली पाणीपातळी आज 18 फुटांवर आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या