पाऊस आता दसरा करूनच जाणार! मॉन्सूनच्या परतीचा प्रवास लांबणार

राज्यातील मुंबईसह विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाची शक्यता असून मंगळवारी गणरायाचे आगमनदेखील पावसातच होणार आहे. सध्या राज्यातील अनेक भागांत पाऊस सुरू आहे आणि सर्वत्र श्रींच्या प्रतिष्ठापनेची तयारी सुरू आहे. दरम्यान मंगळवारी गणरायाच्या आगमनाला पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. प्रामुख्याने पुणे शहर, मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात मंगळवारी पाऊस असणार आहे. तसेच यंदा उशीरा आगमन झालेल्या पावसाच्या परतीचा प्रवासही उशीराच सुरू होणार आहे.

राज्यातील जवळपास सर्वच भागांत मध्यम पावसाचा अंदाज पुणे हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुढील पाच दिवस पाऊस कायम राहणार आहे. या पाच दिवसात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. आग्नेय राजस्थान आणि पश्‍चिम मध्य प्रदेश परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही. रविवारी मात्र राज्यातील काही भागांत पाऊस झाला. सोमवारी नाशिक, नंदुरबारमध्ये पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ तर धुळे, रायगड, पालघर, पुणे जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ दिला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाचा मुहूर्त यंदाही लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तराखंड राज्यांत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच असून, वायव्य हिंदुस्थानातून पावसाच्या परतीसाठी अद्यापही पोषक स्थिती नाही. तिथे पावसाने उघडीप दिल्यानंतर त्याचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी 20 सप्टेंबरला मॉन्सूनचे वारे राजस्थानातून माघारी फिरले होते. मॉन्सूनचे पावसाचे आगमन आणि परतीच्या वेळापत्रकानुसार 17 सप्टेंबर ही त्याच्या राजस्थानातून परतीचा प्रवासाची तारीख आहे. मात्र, सध्या राजस्थानसह वायव्य हिंदुस्थानातील राज्यात हलक्या स्वरुपात पाऊस सुरू आहे. या भागात पाऊस सुरू राहण्यासाठी पोषक प्रणाली तयार होत असल्याने मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यास आणखी उशीर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी 20 सप्टेंबरला राजस्थान आणि गुजरातमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती.

महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीची वाटचाल सुरू होण्यास 14 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहवी लागली. त्यानंतर 23 ऑक्टोबरला मॉ्नसून संपूर्ण देशातून परतला होता. यावर्षी मॉन्सूनचे केरळमधील आगमन 8 जूनपर्यंत लांबले. तळ कोकणात 11 जूनला दाखल झालेल्या मोसमी पावसाची राज्यातील प्रगतीसाठी वाट पाहावी लागली. 23 जूनला राज्यातील पुढील वाटचाल सुरू केलेल्या वाऱ्यांनी दोनच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर नियमित सर्वसाधारण वेळेच्या 6 दिवस आधीच म्हणजेच 2 जुलैला मोसमी पाऊस संपूर्ण देशभरात पोहोचला होता. वायव्य हिंदुस्थानात पावसाने सलग पाच दिवस उघडीप देणे. आर्द्रतेची टक्केवारी कमी होऊन कोरडे हवामान होणे, वाऱ्यांची दिशा बदलणे आवश्यक असते. त्यानंतरच या भागातून मॉन्सून परतल्याचे जाहीर करण्यात येते. त्यामुळे यंदा मॉन्सून दसरा साजरा करूनच परतीचा प्रवास सुरू करेल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.