
सामना प्रतिनिधी । लातूर
गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे बुधवारी मध्यरात्री पासून लातूर जिल्ह्यात आगमन झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सरासरी २५.४४ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणारा नसला तरी तूर, ऊस, कापूस या पिकांसाठी याचा फायदा होणार आहे. मात्र सोयाबीनसाठी या पावसाचा फारसा उपयोग होणार नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
लातूर जिल्ह्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली असली तरी, पिकांचे आत्तापर्यंत मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले आहे. तरीही ऊस, कापूस, तूर या पिकांसाठी या पावसाचा फायदा होणार आहे. मात्र सोयाबीन पिकाला या पावसाचा अधिक फायदा होणार नाही.
देशभरात सर्वाधिक सोयाबीन उत्पादक जिल्ह्यात लातूरचा दुसरा क्रमांक लागतो. मात्र पेरणीनंतर काही बियाणे उगवलेच नाही, त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली होती. पिकांची वाढ झाली आणि पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांना चिंता लागली होती. पिकांच्या उत्पादनावर थेट परिणाम झाला आहे. माळरानावरील जमिनीवर पेरलेल्या सोयाबीनच्या पेरणीचा खर्चही निघणे अवघड आहे, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मागील काही वर्षांपासून लातूर जिल्ह्यातील पर्जन्यमानात बदल झाल्याने जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पेरणी होत होती. पावसाळा सुरू होऊन जवळपास ७६ दिवस झालेले असून आजपर्यंत जिल्ह्यात केवळ २८ दिवस पाऊस झालेला आहे. त्यामुळे यावर्षी पुन्हा उत्पादनात मोठी घट येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



























































