
ऐन हिवाळ्यात डिसेंबर महिन्यात स्वेटरऐवजी रेनकोट वापरण्याची वेळ रत्नागिरीकरांवर आली. सोमवारी सकाळापासून पावसाची रिमझिम सरी पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने अनेकांनी गुंडाळून ठेवलेल्या छत्र्या,रेनकोट बाहेर काढले.काहींनी हिवाळ्यातला पावसाळा अनुभवत भिजण्याचा आनंद घेतला.
रत्नागिरीत रविवारपासूनच दाटलेले ढग पावसाचे संकेत देत होते. सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागात पाऊस झाला. अवेळी आलेल्या पावसामुळे आंबा व्यावसायिक धास्तावले असून पावसामुळे आंब्याच्या झाडांचा मोहर पडून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.



























































