
>> राज चिंचणकर
नाटकाच्या शीर्षकातून त्या नाटकाचे अंतरंग नेहमी उघड होतेच असे नाही, परंतु ‘चर्चा तर होणारच’ हे नाटक मात्र त्याच्या शीर्षकाद्वारे थेट व्यक्तच होते. त्याअनुषंगाने या नाटकात अर्थातच चर्चासत्रे झडली आहेत, पण या नाटकात वैचारिक चर्चेचे संवादी ढोल-ताशे इतक्या जोशात वाजले आहेत की, हे नाटक समाज व व्यवस्थेच्या डोळय़ांत थेट बोट खुपसत राहते आणि आपले म्हणणे ठासून मांडत जाते. पण इतके करूनही हे नाटक त्याचा करमणूकप्रधान बाज काही सोडत नाही, हे या नाटकाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल.
चर्चा किंवा वादांचा हा आलेख सादर करण्यासाठी या नाटकाने ‘कार्यकर्ता’ हा केंद्रबिंदू स्वीकारला असून हा कार्यकर्ता म्हणजे या नाटकाचा कणा आहे. परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या दोन कार्यकर्त्यांच्या जुगलबंदीच्या आडून हे नाटक वर्तमानस्थितीवर अचूक प्रहार करत जाते आणि विचारप्रवृत्त होण्यास भाग पाडते. ‘चर्चा तर होणारच’ असे ठासून सांगत असतानाच आणि त्याला प्रमाण मानत या नाटकात अर्थातच चर्चा झडतेच, परंतु त्या चर्चेच्या मागे असलेला आशय आणि विषय ते ठामपणे दृगोच्चर करते. नाटकाच्या पूर्वार्धात कार्यकर्त्यांच्या तोंडून झडणारी चर्चा नाटकाचे म्हणणे उभे करत जाते, तर दुसऱ्या अंकात त्यामागचे वास्तव उलगडत जाते. साहजिकच पहिला अंक जास्त संवादी आहे, तर दुसऱ्या अंकात त्या विषयातले नाटय़ ठासून भरले आहे.
वर्तमानस्थितीत एकूणच जगताना अनामिक भीतीखाली सतत असल्यासारखे वाटत राहणे आणि भोवतालच्या अशा वातावरणात असे एखादे चर्चात्मक नाटय़ रंगमंचावर सादर होणे यातून एक अंधुकशी का होईना, परंतु थोडी सकारात्मकता जाणवत राहते. प्रवास करत असताना जेव्हा एखाद्या बोगद्यातून बाहेर पडण्याची वेळ येते तसतसा समोर ठिपक्यापासून सुरू होणारा प्रकाश वातावरण निवळत असल्याचे सूचित करत जातो आणि अगदी तसेच या नाटय़कृतीतून बरेच काही प्रकाशमान होत जाते.
हे नाटक संवादाच्या माध्यमातून तर थेट व्यक्त होत राहतेच, परंतु यातल्या भिन्न प्रवृत्तीच्या पात्रांच्या चर्चेतून ते विविध विषयांवर बोलत राहते. लेखक हेमंत एदलाबादकर यांनी अंतर्मनातली ही सगळी वेदना ठसठशीतपणे कागदावर उतरवली आहे आणि त्यांनीच दिग्दर्शक म्हणून ती रंगमंचावर तडफेने उभी केली आहे. लेखकाला वर्तमानस्थितीवर भाष्य करायचे आहे हे तर या संहितेतून उघड होतेच, परंतु त्यासाठी त्यांनी जो प्लॉट निवडला आहे तो संवादीनाटय़ाचा आहे. हे करताना त्यातले सांगणे करमणुकीच्या अंगाने जाईल याचे व्यवधान राखले गेले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापासून वर्तमानकाळाचे संदर्भ खुबीने पेरत आणि त्या परिघात विविध मुद्दय़ांना स्पर्श करत हे नाटक फिरत राहते.
नाटकातली इनमीन तीन पात्रे त्यांच्यात घडवून आणलेल्या वादविवादांच्या माध्यमातून नाटकात गुंतवून ठेवतात. आता दोन कार्यकर्त्यांमध्ये चर्चा घडत असताना यात तिसऱ्या पात्राचे काय काम? असा प्रश्न पडत असला तरी वास्तविक या चर्चेच्या मुळाशी हे तिसरे पात्रच आहे आणि त्याच्याकरवीच या चर्चेला प्रारंभ होतो. एक परदेशी ‘एनजीओ’ एका पुरस्काराच्या निमित्ताने दोन कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक पातळीवरची जुगलबंदी घडवून आणते. त्यासाठी या ‘एनजीओ’चा देशपांडे नामक प्रतिनिधी या प्रािढयेचा एक भाग म्हणून एका बंगल्यात सत्यशील आणि मृणाल या दोन सामाजिक कार्यकर्त्यांना समोरासमोर आणून उभे करतो. चर्चा नाटय़ाचा बाज असलेले हे नाटक अजिबात कंटाळवाणे होत नाही याचे श्रेय नाटकाच्या लेखन व दिग्दर्शनासह यातल्या कलावंतांनाही द्यावे लागेल. यात संवाद हेच बलस्थान असल्याने नाटक शब्दबंबाळ होऊ शकण्याचा संभाव्य धोका कुशलतेने टाळला आहे. कलावंतांनी हे नाटय़ वैचारिक पातळीसोबतच करमणुकीच्या पातळीवरही तितक्याच सक्षमतेने आणून ठेवले आहे. यातल्या मृणाल व सत्यशील या कार्यकर्त्यांच्या भूमिकेत अदिती सारंगधर व आस्ताद काळे आहेत, तर देशपांडे हे पात्र क्षितिज झारापकर यांनी रंगवले आहे.
अदिती सारंगधरने मृणाल या भूमिकेसाठी घेतलेले बेअरिंग तर भन्नाट आहेच आणि त्याचा स्तर शेवटपर्यंत दिमाखात राखत तिने ही कार्यकर्ती लक्षवेधी केली आहे. तिची देहबोली, भाषेला असलेला ग्रामीण स्पर्श, वेळोवेळी घेतलेल्या लकबी या सगळय़ा गोष्टी तिच्या अंगी मुरलेले अभिनय गुण सक्षमतेने स्पष्ट करणाऱ्या आहेत. सत्यशीलच्या भूमिकेत आस्ताद काळे याने परंपरेची कास धरलेला कार्यकर्ता ठाशीवपणे उभा केला आहे. वाचिक अभिनयाचा उत्तम नमुना पेश करत त्याने या भूमिकेत रंग भरले आहेत. या दोन कार्यकर्त्यांच्या जुगलबंदीतही देशपांडे या व्यक्तिरेखेकडे लक्ष खिळून राहील याचे आव्हान क्षितिज झारापकर यांनी लीलया पेलत सहजतेने हे पात्र उभे केले आहे.
नाटकाची तांत्रिक अंगेही तोडीस तोड आहेत. यातल्या संवादांचा टेम्पो सांभाळून राहुल रानडे यांनी दिलेले संगीत असो किंवा अमोघ फडके यांनी केलेली प्रकाशयोजना असो, यातल्या संवादांना आणि त्यायोगे संपूर्ण नाटकालाच त्यांनी उठाव प्राप्त करून दिला आहे. संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य व मंगल केंकरे यांची वेशभूषा या बाजू दोघांनी नीट तोलून धरल्या आहेत. ‘रंगनील ािढएशन्स’ या नाटय़संस्थेचे हे नाटक. एकूणच डोक्याला वैचारिक खाद्य पुरवत आणि अधूनमधून डोळय़ांत अंजन घालत रंजन करणारे आहे.




























































