राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, सभेसाठी घालून दिलेल्या अटीशर्तींचा भंग केल्याने कारवाई

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात संभाजीनगरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संभाजीनगरात झालेल्या राज यांच्या सभेपूर्वी पोलीस आयुक्तांनी काही अटी शर्ती घातला होत्या. या अटी शर्तींच्या अधीन राहून ही सभा घेण्यास परवानगी देण्यात आली होती. या अटी शर्तींचा भंग झाल्याने राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रक्षोभक विधाने जातीय तेढ निर्माण करणे, मर्यादेपेक्षा जास्त गर्दी जमवणे यासाठी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण याविरोधात रस्त्यावर उतरू असं मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यावर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना कडक शब्दात समज दिली आहे. पहिले कायदा मोडायचा आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरायचं हे चालणार नाही असे ते म्हणाले. कायदा हा सगळ्यांसाठी सारखा असून कोणी नियम मोडला असेल तर त्यावर कारवाई होणारच. व्यक्ती कोण हे गौण असून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे असे देसाई म्हणाले.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना या घडामोडींबाबत विचारले असता ते म्हणाले की, कोणी कायद्याचं उल्लंघन करत असेल तर ती व्यक्ती कितीही मोठी असूद्या त्यावर गुन्हे दाखल केले जातात. राऊत पुढे म्हणाले की राज्याच्या बाहेरून काही गुंड प्रवृत्तीचे लोकं आणून राज्यात गडबड करायची असे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांची ताकद नाही अशा लोकांनी हे सुपारीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. या सुपाऱ्या राज्यात चालणार नाही. राज्यातील सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे असून कोणी फार चिंता करण्याची गरज नाही असे राऊत यांनी म्हटले आहे.