हे का बोलताय, हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही! राज ठाकरेंची राज्यपालांच्या विधानावर प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मराठी माणसाच्या भावना दुखावणारे विधान त्यांनी केल्याने जवळपास सगळ्या पक्षांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की,

कोश्यारींची होशियारी?

“आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात.

महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?

उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो.”