
अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली म्हणून काल दंड थोपटून ‘अजित पवार, तुम्ही कुणाचाही नाद करा; पण अनगरकरांचा नाही!’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकेरी भाषेत चॅलेंज देणारे लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळराजे पाटील यांचे वडील तथा भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांनी आज अख्ख्या पवार कुटुंबीयांच्या पायांवर लोळण घेत माफी मागितली. ‘अजित पवार, माफ करा, पदरात घ्या!’ अशी विनवणी राजन पाटील यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठिंब्याच्या जोरावर पाच छोट्या खेडेगावांची मिळून बनलेल्या अनगर नगरपंचायतीची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली. स्थापनेपासून बिनविरोधाची परंपरा असणाऱ्या या गावाच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी उज्ज्वला थिटे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. गाजावाजा करीत थिटे यांनी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, सूचकाची सही नसल्याचे कारण दाखवत त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.
बाळराजे पाटील यांच्यात कोणतीही अपराधीपणाची भावना दिसून आली नाही. आमदार रोहित पवार यांनी बाळराजे पाटील यांच्या वक्तव्याबद्दल राग व्यक्त केल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर, राज्यात रोहित पवारांचा कार्यक्रम मीच पहिल्यांदा घेतला असल्याचे सांगत बाळराजे यांनी माफी मागण्यास बगल दिली. तर, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार मोठे नेते आहेत, त्यांच्यासोबत मी काम केले आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
न्यायालयात दाद मागणार – उज्ज्वला थिटे
माझ्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून माझ्या मुलाची सही आहे. माझा उमेदवारी अर्ज सर्व कायदेशीर प्रकिया पार करून दाखल केला गेला आहे. तरीसुद्धा सूचकाची सही नाही, हे सर्व अविश्वसनीय आहे. त्याविरोधात मी न्यायालयाकडे दाद मागणार आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे, असे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी सांगितले.



























































