इफ्फीत रजनीकांतचा गौरव

842

सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांचा ‘इफ्फी’च्या वतीने दिल्या जाणाऱया ‘आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली ऑफ इफ्फी’ या सर्वेत्कृष्ट पुरस्काराने सन्मान होणार आहे. सुवर्णमहोत्सवी  आंतरराष्ट्रीय हिंदुस्थानी चित्रपट महोत्सव (इफ्फी) 20 ते 24 नोव्हेंबरदरम्यान गोवा येथे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी इफ्फीच्या वतीने दिल्या जाणाऱया आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली ऑफ इफ्फी हा मानाचा पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर केला.

रजनीकांत यांनी चार दशकांहून अधिक काळ हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीत अनमोल योगदान दिले आहे, त्याची केंद्र सरकारने अखेर दखल घेतली आहे. सुतार-पोर्टर-बस कंडक्टर असा सुरू झालेला रजनीकांत यांच्या कारकीर्दीचा प्रवास थक्क करणार आहे. 1950 च्या दशकात कर्नाटकमधील एका मराठी कुटुंबात जन्माला आलेल्या रजनीकांत यांनी आज चित्रपटसृष्टीचे सर्वोच्च शिखर गाठले आहे. आतापर्यंत त्यांनी 170  हून अधिक तमीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याची दखल घेत सरकारने याआधीच त्यांचा ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन गौरव केला आहे. दरम्यान, इफ्फीच्या या महोत्सवात 76 देशांतील 200 सर्वोत्कृष्ट चित्रपट दाखवले जाणार आहेत.

पाच मराठी चित्रपट जाणार
गोवा येथे होणाऱया चित्रपट महोत्सवात दोनशे सर्वोत्कृष्ट चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने  दिठी, ट्रकभर स्वप्न, एक सांगायचंय, अनसेड हार्मोनी, भोंगा आणि मुळशी पॅटर्न हे पाच मराठी चित्रपट जाणार आहेत. या महोत्सवाला जाण्यासाठी नुकतेच 38 चित्रपटांचे परीक्षण झाले असून त्यामधून त्यांची निवड केली असल्याचे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज यांनी दिली.

फ्रेंच अभिनेत्री इझाबेला हुप्पर्ट यांना ‘जीवनगौरव’
आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय फ्रेंच अभिनेत्री इझाबेला हुप्पर्ट यांना इफ्फीच्या वतीने ‘जीवनगौरव’ पुरस्कार दिला जाणार आहे. दहा लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 1971 पासून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केलेल्या हुप्पर्ट यांनी 120 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या