राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी जुना अर्थसंकल्प वाचला, विरोधकांच्या गोंधळानंतर मागितली माफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थान राज्याचा अर्थसंकल्प आज सादर करत असतेवेळी एक गंभीर चूक घडली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी विधानसभेत जुने भाषण वाचले. अर्थसंकल्पाच्या भाषणाच्या छापील पुस्तकामध्ये काही जुन्या भाषणाची पाने घुसवण्यात आली आहेत. याबाबत अनभिज्ञ असलेले गहलोत भाषण वाचत राहिले. हे विरोधकांच्या लक्षात आल्यानंतर ते आधी हसले आणि नंतर त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. या गोंधळामुळे सदनाचे कामकाज अर्धा तासासाठी स्थगित करण्यात आलं.

मुख्यमंत्री गहलोत यांनी घडल्या प्रकाराबद्दल सदनाची माफी मागितली. अर्थसंकल्प वाचला जात असताना सदनाचे कामकाज स्थगित केलं जाण्याची इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. हा घोळ अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारपणामुळे सरकारची मोठी फजिती झाली आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे.

राजस्थान विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 3 मिनिटांमध्ये गोंधळाला सुरुवात झाली होती. गोंधळ वाढत चाललेला पाहून विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी यांनी कामकाज स्थगित केले. इतकी गंभीर चूक झाल्याने मुख्यमंत्री गहलोत यांनी राजस्थानच्या मुख्य सचिवांना बोलावून घेतले आहे. सदर प्रकरणी त्यांची झाडाझडती होण्याची शक्यता आहे. सदनाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांनीही माफी मागितली. सदर प्रकार एक मानवीय चूक असल्याने झालं ते विसरून जाऊन कामकाज पुढे चालू दिलं जावं अशी त्यांनी विनंती केली. यावर विरोधकांनी सांगितले की कामकाज स्थगित करून अर्थसंकल्प सादरीकरणासाठी नवी तारीख जाहीर केली जावी.