पित्यानेच केला मुलीवर सहा महिने बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । जयपूर

बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील झालवाड जिल्ह्यात राहणाऱ्या एका ४३ वर्षीय पित्यावर त्याच्या १३ वर्षांच्या मुलीसोबत सहा महिने बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिसांनी या नराधम पित्याला अटक केली असून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी आरोपीला ४ जून रोजी राजस्थानच्या मनहोरेथाना परिसरातून अटक केली होती. पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पिता घरातच सहा महिन्यांपासून पोटच्या मुलीवर बलात्कार करत होता. मजदूरी करून पोट भरणारा हा आरोपी आपल्या पत्नीपासून वेगळा राहत असून त्याला तीन मुले आहेत. सहा महिन्यांआधी तो त्याच्या पत्नीकडे परतला आणि मुलांना सांभाळण्याचे आश्वासन देऊन तो आपल्या १३ वर्षांची मुलगी आणि लहान मुलाला आपल्यासोबत घेऊन आला होता.

ही घटना उघडकीस तेव्हा आली, जेव्हा आरोपीची पत्नी आपल्या मुलांना भेटण्यासाठी घरी आली. त्यावेळी पीडितेने आपल्या पित्याचे कृत्य आपल्या आईला सांगितले. पीडितेच्या आईने तात्काळ पोलिसांत धाव घेत आपल्या पतीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सदर प्रकरणी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.