
धावत्या बसला भीषण आग लागल्याची घटना राजस्थानमधील जैसलमेरमध्ये मंगळवारी घडली. या आगीत बसमधील अनेक प्रवासी होरपळल्याची माहिती मिळते. थैयत भागात लष्करी ठाण्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. पेटत्या बसचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये बसमधून दाट धुराचे लोट येत असल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.
आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवळील लष्कराच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जोधपूर येथील रुग्णालयता रेफर करण्यात आले आहे.
घटनेनंतर जैसलमेर जिल्हा प्रशासनाने अधिकृत निवेदन जारी करत घटनेची पुष्टी केली. जिल्हा प्रशासनाची पथके देखील घटनास्थळी उपस्थित आहेत आणि बाधित प्रवाशांना मदत करत आहेत.