
दुखापतीचे ग्रहण, बायो बबलचा धसका आणि कोरोनाची भयावह लाट अशा कारणांमुळे राजस्थान रॉयल्स संघातील चार परदेशी खेळाडू मायदेशी परतल्याने हा संघ अडचणीत सापडला आहे. आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या निम्या लढतीही अद्यापि झालेल्या नाहीत. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघावर दुसऱया संघांकडून खेळाडू उधार घेण्याची वेळ आली आहे.
अष्टपैलू बेन स्टोक्स, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर या क्रिकेटविश्वातील आघाडीच्या खेळाडूंमुळे राजस्थान रॉयल्सचा संघ तगडा वाटत होता. मात्र, केवळ एक लढत खेळून बेन स्टोक्स जायबंदी झाला. जोफ्रा आर्चर दुखापतीतून सावरू न शकल्याने त्याला आयपीएलमध्ये सहभागीच होता आले नाही. त्यातच लियाम लिव्हिंगस्टोने बायो बबलमुळे थकवा आल्याचे कारण देत आयपीएलमधून माघार घेतली. रविवारी अॅण्ड्रय़ू टेने हिंदुस्थानातील कोरोनाच्या प्रकोपाचा धसका घेत ऑस्ट्रेलियात परत जाण्याचा निर्णय घेतला. या चार खेळाडूंनी माघार घेतल्याने राजस्थान रॉयल्स संघाची घडी विस्कटली आहे. राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत पाच सामने खेळले असून, त्यापैकी दोन लढती जिंकल्या आहेत. आता गुरुवारी त्यांची लढत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.
राजस्थान रॉयल्स संघातील एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलमधील उर्वरित सामने खेळण्यासाठी इतर संघाकडून खेळाडू उधार घेण्याची आमची योजना आहे. यासंदर्भात आम्ही अन्य संघांशी संपर्क केला आहे, पण सध्या याबाबत काही ठरवण्यात आले नाही.
आयपीएलमध्ये खेळाडूंना अन्य संघांकडून घेण्याचा कालावधी सोमवारपासून सुरू झाला आहे. साखळी फेरी संपेपर्यंत इतर संघांकडून खेळाडू घेता येणार आहे. बाद फेरी सुरू होताच खेळाडू देता पिंवा घेता येणार नाहीत. आयपीएलच्या नियमानुसार कमीत कमी दोन सामने खेळणाऱया खेळाडूला दुसरा संघ स्वतःकडे घेऊ शकतो. त्यामुळे राजस्थानच्या ताफ्यात दुसऱया संघातून कुठले क्रिकेटपटू सामील होतात हे बघावे लागेल.





























































