आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचा पूर्वार्ध संपला, उत्तरार्ध सुरू झाला. आर्धी आयपीएल संपल्याने आता परतीच्या लढती सुरू झाल्या असल्याने प्ले ऑफच्या शर्यतीचा थरारही वाढलाय. राजस्थान रॉयल्सचा संघ प्ले ऑफपासून केवळ एक विजय दूर आहे. याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपरकिंग्ज, लखनौ सुपरजायंट्स व गुजरात टायटन्स हे पाच संघही सध्या प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत, मात्र मुंबई इंडियन्ससह दिल्ली पॅपिटल्स, पंजाब किंग्ज व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या चार संघांची प्ले ऑफच्या शर्यतीतील वाट अतिशय बिकट आहे. बंगळुरूचे तर आव्हान संपल्यात जमा आहे.
राजस्थान रॉयल्सने आठपैकी सात लढती जिंकून 14 गुणांसह गुणतक्त्यामध्ये ‘नंबर वन’चे सिंहासन काबीज केलेले आहे. आणखी एक विजय मिळविल्यास प्ले ऑफचे तिकीट बुक करणारा हा पहिला संघ ठरेल. याचबरोबर कोलकाता व हैदराबाद या संघांनी सातपैकी 5-5 लढती जिंकल्या असून ते प्रत्येकी 10 गुणांसह गुणतक्त्यामध्ये अनुक्रमे दुसऱया व तिसऱया स्थानावर आहेत. या संघांना प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी उर्वरित सातपैकी 3-3 लढती जिंकाव्या लागतील. चेन्नई, लखनौ व गुजरात या संघांच्या खात्यात प्रत्येकी 8 गुण जमा आहेत. चेन्नई-लखनौ लढतीच्या पूर्वी हे प्ले ऑफचे गणित मांडत असल्याने दोन्ही संघांनी सातपैकी 4-4 लढती जिंकलेल्या आहेत. त्यामुळे या उभय संघांना आता उर्वरित सातपैकी पुन्हा 4-4 लढती जिंकाव्या लागतील. शिवाय नेट रन रेटच्या समीकरणात दगाफटका होऊ नये म्हणून या संघांना तिकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.
तळाच्या चार संघांची वाट बिकट
मुंबई, दिल्ली, पंजाब, बंगळुरू या संघांनीही यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येकी आठ लढती खेळल्याय. यात मुंबई व दिल्ली या संघांनी 3-3 लढती जिंकल्या आहेत. पंजाबला तर दोनच लढती जिंकता आल्या असून गुणतक्त्यात रसातळाला असलेल्या बंगळुरूने आठपैकी सात लढती गमावल्या आहेत. मुंबई व दिल्ली या संघांना तरी जरतरच्या समीकरणात प्ले ऑफची संधी असेल, मात्र दिल्लीला प्ले ऑफ गाठण्यासाठी उर्वरित सर्व सहा लढती जिंकाव्या लागतील. बंगळुरूने आठ लढतीत एकच विजय मिळविता आला असून त्यांनी उर्वरित सहा लढती जिंकल्या तरी त्यांच्याकडे 14 गुण होणार आहे. कदाचित एखाद्या वेळी प्ले ऑफच्या शर्यतीतील चौथा संघ 14 गुणांचा असला तरी नेट रनरेटवर या संघाचे भवितव्य अवलंबून असेल.