मिस युनिव्हर्सचा मुकुट कोणाच्या डोक्यावर! हिंदुस्थानची मनिका विश्वकर्मा अंतिम फेरीत

थायलंडच्या बँकॉकमध्ये सुरू असलेल्या 74 व्या मिस युनिव्हर्स 2025 च्या स्पर्धेत राजस्थानच्या मनिका विश्वकर्माने अंतिम फेरीत धडक मारली आहे. जगभरातील एकूण 130 देशांच्या सौंदर्यवती यात सहभागी आहेत. टॉप फेव्हरिट्सच्या यादीत स्थान मिळवून मनिका विश्वकर्माने मिस युनिव्हर्सचा मुकुट मिळवण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

राजस्थानची 22 वर्षीय मनिका विश्वकर्मा ही मिस युनिव्हर्स स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करत आहे. तिचे सौंदर्य आणि स्टाइलची सध्या जोरदार चर्चा असून या स्पर्धेत तिचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. मनिका विश्वकर्माने याआधी मिस युनिव्हर्स राजस्थान 2024 चा मुकुट जिंकला आहे. त्यानंतर तिने 2025 मध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स इंडियाच्या मुकुटावर आपले नाव कोरलेय. आता संपूर्ण देशाच्या नजरा मनिकावर लागल्या आहेत. मिस युनिव्हर्सचा मुकुट जिंकून हिंदुस्थानचे नाव उज्ज्वल करण्याची संधी मनिकाकडे आहे.

आज ग्रँड फिनाले

गेल्या 19 दिवसांपासून सुरू असलेल्या मिस युनिव्हर्सचा ग्रँड फिनाले उद्या, 21 नोव्हेंबर रोजी बँकॉकमध्ये पार पडणार आहे. हिंदुस्थानी वेळेनुसार, सकाळी साडेसहा वाजता याचे लाइव्ह प्रसारण सुरू होईल. मिस युनिव्हर्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हे फ्रीमध्ये पाहता येईल. सुष्मिता सेन, लारा दत्ता आणि हरनाज संधू या तिघींनंतर मनिकाला मिस युनिव्हर्स जिंकण्याची संधी आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकणाऱ्या सौंदर्यवतीला रोख रक्कम, स्कॉलरशिप, लक्झरी कार, मुकुट मिळेल.