
देवदर्शनासाठी डोंबिवली येथून 20 जण देवगड तालुक्यात आले होते. त्यातील राजेश पिराजी कसोटे(57) या भाविकाचा कुणकेश्वर येथे देवदर्शन केल्यानंतर ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी 6:10 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश पिराजी कसोटे यांच्यासह 20 जण रविवारी डोंबिवली येथून खाजगी ट्रॅव्हल्स करून देवदर्शनासाठी देवगडमध्ये आले होते. इळयेसडा येथील स्वामी समर्थ मठ येथे दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी 6 वाजता कुणकेश्वर येथे देवदर्शनासाठी आले. देवदर्शन करून बाहेर पडल्यानंतर राजेश पिराजी कसोटे हे गाडीकडे जात असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांचा छातीत जोराच्या कळा येवू लागल्या. हा प्रकार गाडीचे चालक अनिल शंकर लष्कर यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन प्रथम त्यांना आधार दिला. त्यानंतर त्यांच्यासमवेत आलेल्या अन्य सहकाऱ्यांना सांगितले. त्यांनी तात्काळ कसोटे यांना उपचारासाठी देवगडमधील डॉ. बोरळकर यांच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी 7 वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत पुंडलिक संभाजी ठाकूर यांनी देवगड पोलीस स्थानकात खबर दिल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. या घटनेबाबत पो.हे.कॉ.राजन जाधव तपास करीत आहेत.



























































