
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण एकनिष्ठ आहोत, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. पक्षादेश मानून शिवसैनिकच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सायंकाळी राजेश क्षीरसागर यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. यावेळी क्षीरसागर बोलत होते. आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यासह महापालिकेत शिवसेनेचा महापौर करण्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कॅबिनेट दर्जाच्या नियोजन मंडळाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करून राज्याचे काम दिले आहे. आमदार पदापेक्षा हे पद मोठे आहे. हे प्रेम आपण कधीच विसरू शकत नसल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.


























































