
सामना ऑनलाईन, इंदूर
मध्य प्रदेशात निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांना आणि आमदारांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून सावेर गावात तर गावकऱ्यांनी भाजप आमदाराला शिव्यांची लाखोली वाहत पळवून लावले.
निवडणूक म्हटली की, आश्वासने आलीच. सावेरमधील मतदारांना मात्र हे मंजूर नसावे. कारण त्यांना आश्वासने नको आहेत, तर गेल्या पाच वर्षांत काय केले त्याचा हिशेब हवा आहे. भाजप आमदार राजेश सोनकर जेव्हा प्रचारासाठी बीसा खेडा गावात पोहोचले तेव्हा त्यांचे स्वागत ‘रोड नहीं तो वोट नहीं’ या घोषणांनी झाले.
संतापलेले ग्रामस्थ एवढय़ावरच थांबले नाहीत तर त्यांनी आमदार सोनकर यांना गावात प्रवेशबंदी केली आणि शिव्या घालत अक्षरशः हाकलून लावले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच हे राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा सोनकर यांनी केला आहे.




























































