हवे तर आमचे सैन्य घ्या, पण तुमचा दहशतवाद संपवा – राजनाथ सिंह

‘खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे’ अशा भूमिकेला कवटाळून दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानची रविवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कोंडी केली. पाकिस्तानने गरज पडली तर आमच्या सैन्याची मदत घ्यावी आणि स्वत:च्या मातीतला दहशतवाद गाडून टाकावा, असे आवाहन राजनाथ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना केले आहे.

हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाल येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला स्वत:च्या मातीतला दहशतवाद स्वत:च संपवावा, असा सल्ला दिला. इम्रान खान हे जर खरंच स्वत:च्या मातीतला दहशतवाद संपवायला तयार असतील तर त्यांना आम्ही आमच्या लष्कराची मदत पुरवू, असे ते म्हणाले. यावेळी इम्रान यांच्या कश्मीरबाबतच्या भूमिकेवर राजनाथ यांनी हल्ला केला. कश्मीरला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू, आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवू अशी भाषा करणाऱया इम्रान यांनी कश्मीर विसरून जावे. किती आदळआपट केलात तरी काहीच घडणार नाही. आमच्यावर कुणीच दबाव टाकू शकत नाही, अशा शब्दांत राजनाथ यांनी इम्रान यांना सुनावले.

…तर पाकिस्तानचे तुकडे होतील!

तुम्ही 1947 साली धर्माच्या नावाखाली दोन राष्ट्रे निर्माण केलीत. त्यानंतर 1971 साली तुमच्याच देशाचे दोन तुकडे झाले. अजून तुम्ही सुधारला नाहीत तर भविष्यात तुमचे तुकडे तुकडे होतील, असा दमही राजनाथ सिंह यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या