रजनीकांत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा जोक केला, अभिनेता झाला ट्रोल

1079

सोशल मीडियावर अभिनेते रजनीकांत यांच्याशी निगडीत विनोद हे खरेतर नवीन नाहीत. प्रसंग कोणताही असला तरी त्यानुरुप रजनीकांत यांचे विनोद तयार होतात आणि खसखस पिकतेच. पण, कोरोनासारख्या गंभीर विषयावरून रजनीकांत यांच्यावर विनोद करणं एका अभिनेत्याला महागात पडलं आहे. कारण, नेटकऱ्यांनी या अभिनेत्याला ट्रोल केलं आहे.

हा अभिनेता म्हणजे रोहित रॉय आहे. रोहित शक्यतो वादांपासून लांब राहतो. पण, त्याने नुकताच सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. त्यात अभिनेते रजनीकांत यांना कोरोना झाल्याचं म्हटलं होतं. त्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रजनीकांत यांच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनीही त्याला शाब्दिक फटके द्यायला सुरुवात केली.

rohit-roy-actor

एखाद्याला इतका जीवघेणा आजार व्हावा अशी मानसिकता चूक असल्याचं नेटकऱ्याचं म्हणणं होतं. तर दाक्षिणात्य राज्यांमध्ये रजनीकांत यांना देव मानलं जातं. अशा पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये निराशेचं वातावरण निर्माण होऊ शकतं, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी रोहितची कानउघाडणी केली. सगळीकडून ट्रोल झाल्यानंतर रोहित याने हा फक्त एक विनोद असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. मी हे फक्त विनोद म्हणून आणि तेही स्वच्छ मनाने शेअर केलं होतं. कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असं रोहित म्हणाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या