राजस्थानात निवडणुकीत राजपुतांचा भाजपवर बहिष्कार? महिलांबद्दल अपशब्द बोलणारा उमेदवार बदलण्याची मागणी

राजस्थानात राजपूत समाज भाजपवर प्रचंड नाराज आहे. आपल्या मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मतदान करणार नाही, असा निर्धार राजपूत समाजाने केला आहे. करणी सेनेने भाजप नेत्यांना इशारा दिला आहे. भारतीय जनता पार्टीचे गुजरातमधील राजकोटचे उमेदवार पुरुषोत्तम रुपाला यांनी महिलांबद्दल अवमानकारक विधाने केली होती. त्यामुळे यावेळी त्यांना तिकीट देऊ नये. त्यांच्या जागी इतर उमेदवार द्यावा अशी मागणी करणी सेनेची असल्याचे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे उदयपूर जिल्हा अध्यक्ष अर्जुनसिंह चुंडावत गढपुरा यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपला राजस्थानात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

रुपाला यांनी राजपूत महिलांबद्दल उच्चारलेले अपशब्द तसेच विधानांमुळे त्यांना राजपूत समाजाचा प्रचंड विरोध आहे. तसेच काही अधिकाऱयांनीही आक्षेपार्ह विधाने केली. त्यामुळे राजपूत समाजाचा अवमान करणाऱया अधिकाऱयांवरही कडक कारवाई करण्याची मागणी करणी सेनेने केली आहे. राजपूत समाजातील 90 टक्के लोक भाजपला मतदान करतात. त्यामुळे राजपूत समाजाची नाराजी ओढवून घेणे भाजपला परवडणारे नाही. तसेच इतिहासातही राजपुतांच्या विरोधात जाणाऱयाला पराभव स्वीकारावा लागल्याच्या नोंदी आहेत. चितौडगढ विधानसभेत भाजपचे चंद्रभानसिंह आक्या यांचे डिपॉजिटही जप्त झाले होते.

तीव्र आंदोलन छेडणार

गुजरातमधील राजकोटचे भाजप उमेदवार पुरुषोत्तम रुपाला यांना हटवले नाही तर राजपूत समाजाची नाराजी भाजपला पत्करावी लागेल, असा इशारा करणी सेनेने दिला आहे. त्याचबरोबर देशभरात तीव्र आंदोलन छेडू असेही म्हटले आहे. चितौडगड येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपाल सिंह मकराना यांनी, 16 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर राजस्थानात भाजपविरोधात आंदोलन उभे केले जाईल असे स्पष्ट केले आहे.