
केंद्र सरकारने देशावर लादलेल्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱयांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला प्रांतिक व जातीय रंग देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. कृषी कायद्यामुळे भविष्यात शेतकरी अदानी-अंबानी या उद्योजकांचे गुलाम होणार आहेत. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने मंगळवारी (दि. 8) ‘हिंदुस्थान बंद’ची हाक दिली आहे. केवळ शेतकऱयांसाठी नव्हे तर समाजाची लढाई म्हणून सर्वसामान्य जनतेसह समाजातील विविध घटकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केले.
राजू शेट्टी म्हणाले, कृषी विधेयकाच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू आहे. परंतु, पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱयांचे हे आंदोलन असल्याचे सांगून याला प्रांतिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जातोय. शेतकऱयांच्या या आंदोलनात खलिस्तानवादी शिरलेत असे सांगून जातीय रंग दिला जात आहे. शेतकरी हे नेमके कोण आहेत, दहशतवादी आहेत की राष्ट्रविरोधी आहेत हे सरकारने आधी स्पष्ट करावे. कायद्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी (दि. 8) हिंदुस्थान बंदची हाक दिली आहे. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून बंद पाळला जाईल. शेतकरी या दिवशी शेतमाल विकणार नाहीत, असा निर्णय घेतला आहे. ही समाजाची लढाई असून, त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.
एफआरपी न देणारे कारखाने बंद पाडू
n सांगली आणि कोल्हापूर जिह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी देण्याचे मान्य केले आहे. अजून काही कारखान्यांची मागील एफआरपीची रक्कम मिळालेली नाही. ज्या कारखान्यांनी अद्याप एफआरपी दिलेली नाही त्यांना ऊसगाळपाचे परवाने देऊ नयेत, जर त्यांना बेकायदेशीर परवाने दिले तर तो कारखाना आम्ही तीव्र आंदोलन करून बंद पाडू आणि साखर आयुक्तांना त्यांचे क्रशिंग लायसन्स रद्द करण्यास भाग पाडू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
करार शेतीत ‘कडकनाथ’सारखे घोटाळे
n केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात देशातील 98 टक्के लोक आहेत. हिंदुस्थानात करार पद्धतीने शेती कधीच यशस्वी झाली नाही. कडकनाथ हा करार शेतीचाच एक प्रयोग आहे. त्यामुळे यात काय काय घोटाळे होतात हे सर्व शेतकऱयांना माहीत आहे. मूठभर लोकांच्या भल्यासाठी केंद्र सरकारने हे विधेयक पारित केल्याचा टोला राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता लगावला.
























































