
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर बोलण्याची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पात्रता नाही, अशा बोचऱ्या शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी टीका केली. विलासराव देशमुख हे सर्वसामान्यांचे फोन उचलणारे नेते होते. मात्र रवींद्र चव्हाण यांनी ते आधी स्वतःच्या आमदारांचे तरी फोन उचलतात का हे पाहावे, असा टोला शेट्टी यांनी लगावला. विलासरावांची उंची किती होती आणि रवींद्र चव्हाण यांची उंची किती आहे हे पाहायला हवे. खरे तर प्रत्येकाने आपल्या पात्रतेनुसारच राहिले पाहिजे, असेही ते या वेळी म्हणाले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी विरोधी पक्षात असूनही त्यांचा आदर करत होतो. कारण ते आदर करण्यासारखे व्यक्तिमत्त्व होते, असे ते म्हणाले.


























































