
विधानसभा सदस्यांतून निवडून जाणाऱ्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रातून एकूण सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, भाजपकडून पीयूष गोयल, कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्यासह सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक, इम्रान प्रतापगढी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार की लढत होणार यावर प्रश्नचिन्ह आहे. निवडणूक झाली तरी महाविकास आघाडीचेच पारडे जड असल्याने भाजपचे महाडिक अर्ज मागे घेणार की निवडणूक लढणार याबाबत उत्सुकता आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 मे आहे, तर 1 जून रोजी अर्जांची छाननी झाल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी 2 जून आणि 3 जून हे दोन दिवस आहेत. भाजपकडे असलेले 113 आमदारांचे संख्याबळ विरोधात महाविकास आघाडीकडे असलेल्या 171 आमदारांचे संख्याबळ पाहता आघाडीचेच पारडे जड असून 3 जूनपर्यंत भाजपच्या धनंजय महाडिक यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे घेतला जाईल आणि ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडीकडे पहिल्या पसंतीची 45 मते अतिरिक्त
भाजपकडे स्वतःचे 106, अपक्ष 5 आणि मनसे 1 व जनसुराज्य 1 असे 113 इतके संख्याबळ आहे. मविआकडे स्वतःचे 152, अपक्ष 8 आणि छोटे पक्षांचे 11 असे 171 संख्याबळ आहे, तर एमआयएम, सीपीआय असे 3 सदस्य तटस्थ राहू शकतात. भाजपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी पहिल्या क्रमांकाच्या 13 मतांची गरज आहे, तर आघाडीकडे तिसरा उमेदवार निवडून देऊनही पहिल्या पसंतीची 45 मते शिल्लक राहतात. या मतांवर महाविकास आघाडीचे चौथे उमेदवार म्हणजेच शिवसेनेचे संजय पवार यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
महाविकास आघाडीकडील छोटे पक्ष
– बविआ (03), समाजवादी (02), प्रहार (02), स्वाभिमानी (02), रासप (01), शेकाप (01), क्रांतिकारी शेतकरी पक्ष (01)
भाजपकडील पक्ष –
मनसे (01), जनसुराज्य (01).
तटस्थ – एमआयएम (02), माकप (01)
पक्षीय बलाबल
काँग्रेस 44, राष्ट्रवादी 53, शिवसेना 55, भाजप 106, छोटे पक्ष 16 (बविआ 3, सपा 2, एमआयएम 2, प्रहार 2, मनसे 1, माकप 1, स्वाभिमानी 1, रासप 1, जनसुराज्य 1, शेकाप 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1), अपक्ष 13, असे 287 सदस्य विधानसभेत आहेत.
पक्षनिहाय उमेदवार
शिवसेना – शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, संजय पवार
राष्ट्रवादी – राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल
काँग्रेस – इम्रान प्रतापगढी
भाजप – केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक
सर्वाधिक छोटे पक्ष आणि अपक्ष महाविकास आघाडीकडेच
महाविकास आघाडीकडील अपक्ष – मंजुळा गावीत (साक्री), चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), आशीष जैस्वाल (नागपूर), नरेंद्र भोंडेकर (भंडारा), गीता जैन (मीरा-भाईंदर), राजेंद्र यड्रावकर (शिरोळ), संजय शिंदे (करमाळा)
भाजपकडील अपक्ष
– रवी राणा (बडनेरा), विनोद अग्रवाल (चंद्रपूर), राजा राऊत (बार्शी), प्रकाश आवाडे (इचलकरंजी)


























































