
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याचा निषेध करण्यासाठी काळी वेशभूषा करून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये व भाजपचे आमदार सुरजीतसिंह ठाकूर यांच्यामध्ये तिरंगा फडकवण्याच्या मुद्दय़ावरून आज चांगलीच खडाजंगी झाली. गजभिये यांनी हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज काठीला गुंडाळल्याने सुरजीतसिंह ठाकूर संतप्त झाले. राष्ट्रध्वजाचा अवमान कशाला करताय अशा शब्दांत जाब विचारताच गजभियेंनी काढता पाय घेतला. या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना प्रकाश गजभिये प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, सीएए, एनआरसी आणि एनपीआर या कायद्याचा निषेध करण्यासाठी मी ही वेशभूषा करून आलो होतो.

































































